Home > Politics > नवज्योत सिंह सिद्धू यांनी पंजाब कॉंग्रेसचा राजीनामा का दिला? 'ही' आहेत 5 महत्त्वाची कारणं

नवज्योत सिंह सिद्धू यांनी पंजाब कॉंग्रेसचा राजीनामा का दिला? 'ही' आहेत 5 महत्त्वाची कारणं

नवज्योत सिंह सिद्धू यांनी पंजाब कॉंग्रेसचा राजीनामा का दिला? ही आहेत 5 महत्त्वाची कारणं
X

पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेले वादळ मुख्यमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलूनही संपायचं नाव घेत नाही आहेत. दरम्यान, नवज्योत सिंह सिद्धू यांच्या मागणीवरून कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकण्यात आलं होतं आणि चरणजित सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं. ज्यामुळे सिद्धू खूप आनंदी होते. मात्र, आता त्याच सिद्धूने प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

एवढंच नाही तर, चरणजित सिंह चन्नी यांच्या सरकारमधील एका मंत्र्याने तर शपथ घेतल्यानंतर दोन दिवसांनीच पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता प्रश्न असा आहे की, आता सिद्धूच्या नाराजीचं कारण काय? त्यांना नक्की काय हवं आहे? ते सरकार आणि पक्ष सुरळीत केव्हा चालेल? निरीक्षकांचं म्हणणं आहे की, चन्नी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यापासूनच सिद्धू संतापले आहेत.

दरम्यान, चन्नी सरकारमधील मंत्र्यांच्या शपथविधीच्या काही तासांपूर्वी सहा आमदारांनी बंड केलं होतं. त्यांनी सिद्धू यांना पत्र लिहून राणा गुरजीत सिंह यांचा मंत्रिमंडळात समावेश करू नये अशी मागणी केली होती. गुरजीत सिंह यांच्यावर वाळू उत्खनन घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप होता. ज्यामुळे त्यांना 2018 मध्ये पदावरून काढून टाकण्यात आलं होतं.

दरम्यान असं ही म्हटलं जात आहे की, सिद्धू स्वतः गुरजीत सिंह यांना मंत्री बनवू इच्छित नव्हते आणि त्यांच्या इशाऱ्यावरच हे पत्र लिहिले गेले होते. पण हायकमांडने गुरजीत सिंह यांचा मंत्रिमंडळात समावेश केला. आणि सिद्धूला हे असह्य झालं.

यानंतर, केंद्रीय नेतृत्वाने पंजाब काँग्रेसचे कार्यप्रमुख तसेच सिद्धू यांचे जवळचे मानले जाणारे कुलजीत सिंह नागरा यांना पदावरून हटवण्यात आलं. मात्र, या दोन्ही गोष्टींनी सर्वकाही सिद्धूच्या सांगण्याप्रमाणे होणार नाही. हे कॉग्रेस नेतृत्वाने स्पष्ट केलं होतं. एवढंच नव्हे तर नवज्योत सिंह सिद्धू यांचे टीकाकार डॉ.राजकुमार वर्क, यांचादेखील सरकारमध्ये समावेश करण्यात आला. आणि सिद्धू यांना याचं देखील वाईट वाटलं.

खाते वाटप…

सिद्धू यांचा मंत्रिमंडळाच्या खाते वाटपातही फारसा सहभाग नव्हता. कारण, सिद्धू यांना उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांना गृहमंत्रिपद मिळावे असं वाटत नव्हतं, हा विभाग मुख्यमंत्र्यांकडेच राहावा अशी त्यांची इच्छा होती.

दरम्यान, यापूर्वी रंधावा यांना मुख्यमंत्री बनवण्याची चर्चा सुरू होती, त्यांच्या समर्थकांनी मिठाई देखील वाटली होती. मात्र, सिद्धू यांनी असं म्हणत विरोध केला की, जर एखाद्या जाटला मुख्यमंत्री बनवायचे असेल तर त्यांनाच मुख्यमंत्री बनवले पाहिजे. आणि यानंतर रंधवाऐवजी चन्नी या दलित नेत्याला संधी देण्यात आली.

महाधिवक्ता

पंजाब सरकार ए. पी. एस. देओल यांना महाधिवक्ता बनवण्यात आलं. ज्यामुळे, सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. कारण देओल हे डीजीपी सुमेध सिंह सैनी यांचे वकील आहेत. सुमेध सिंह सैनी हे पदावर असताना गुरु ग्रंथ साहिब सोबत या शिख समुदायांच्या धर्मग्रंथाबाबत गैरवर्तन करण्यात आलं आणि त्याविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी गोळीबार देखील झाला.

दरम्यान, देओल यांची महाधिवक्ता म्हणून नेमणूक केल्याने सिद्धू यांचे समर्थक संतप्त झाले होते. कारण, बेहबल कलन गोळीबारातील दोषींना शिक्षा झाली पाहिजे ही त्यांची भूमिका होती.

डीजीपी

सिद्धू यांची नाराजी शिगेला पोहोचली जेव्हा, उच्च अधिकाऱ्यांची नेमणूक त्यांच्या मर्जीने झाली नाही. सिद्धूचे सल्लागार मुहम्मद मुस्तफा यांना त्यांचे आवडते एस चट्टोपाध्याय यांना पोलीस महासंचालक बनवायचे होते. पण चन्नीने आय. एस. साहोटा यांची पोलीस प्रमुख म्हणून नियुक्ती केली.

चन्नीवर राग

सिद्धू यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे हे कुणापासून लपलेले नाही. सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली पुढील निवडणूक लढवली जाईल, असे ज्या प्रकारे आधी सांगितले गेले होते, त्यातून मुख्यमंत्र्यांबाबत चुकीचे संकेत मिळाले. असं समजलं गेलं की, चन्नी हे थोड्या काळासाठी बनवले गेलेले, तात्पुरते मुख्यमंत्री आहेत. जे सिद्धूसाठी खुर्ची खाली करतील.

मात्र, चन्नी हे दलित नेते आहेत, त्यांना एकदा मुख्यमंत्री बनवल्यावर काढून टाकणं कठीण आहे. त्यामुळे पुढील निवडणूक सिद्धू आणि चन्नी या दोघांच्या नेतृत्वाखाली लढली जाईल, असे प्रदेश काँग्रेसने म्हटलं आहे.

दरम्यान, क्रिकेटरपासून राजकारणी बनलेले सिद्धू यांना हे समजलं आहे की, चन्नी हे रात्रीचे पहारेकरी नाहीत, म्हणजेच त्यांना मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी करण्यासाठी मुख्यमंत्री बनवले गेले नाही.

त्यामुळे, सिद्धू यांनी पुन्हा एकदा दबावाचे राजकारण सुरू केले आहे आणि राजीनाम्याची गुगली फेकली आहे. सिद्धू यांचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आला नसला तरीही, आता पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Updated : 29 Sep 2021 7:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top