Home > Politics > बंडखोर शिवसेना आमदारांचा राग उद्धव ठाकरेंच्या बडव्यांवर

बंडखोर शिवसेना आमदारांचा राग उद्धव ठाकरेंच्या बडव्यांवर

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची संख्या गेल्या काही तासात वाढली आहे. पण या आमदारांच्या नाराजीचे कारण नेमके काय अशी चर्चा असताना आता एका बंडखोर आमदारानेच पत्रातून ते कारण जाहीर केले आहे.

बंडखोर शिवसेना आमदारांचा राग उद्धव ठाकरेंच्या बडव्यांवर
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात बंडखोर आमदारांना आवाहन करत परत बोलावले आहे. पण आता एकनाथ शिंदे यांनी आपल्यासह बंडखोर आमदारांच्या नाराजीचे कारण एका पत्रातून उघड केले आहे. आपल्याला सत्तेची अपेक्षा नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी तातडीने वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर अनेक शिवसैनिक वर्षा बंगल्यावर हजर झाले आणि त्यांना समर्थनाच्या घोषणा दिल्या. यानंतर आमदार संजय शिरसाठ यांनी आता एक पत्रच थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडियावर हे पत्र प्रसिद्ध केले आहे.


बंडखोर शिवसेना आमदारांचा राग उद्धव ठाकरेंच्या बडव्यांवर

श्री. उध्दवजी ठाकरे.

मुख्यमंत्री, महाराष्ट्र.

आमचा विठ्ठल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान. बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय..

पत्रास कारण की...

काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) वडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनित ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासा तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही.

मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रत्रांसाठी, वैयक्तिक अडचणीसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्याकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो.

तीन ते चार लाख मतदारामधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे? हीच सर्व हाल अपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली. आमची व्यथा, आपल्या आजूबाजूचे बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही, किंबहुना आपल्यापर्यंत ती पोहोचवली सुद्धा जात नव्हती. मात्र याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा दरवाजा उघडा होता. आणि मतदार संघात असलेली वाईट परिस्थिती, मतदार संघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान.. आमची ही सर्व गान्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना, आम्ही हा निर्णय घेण्यास घ्यायला लावला.

हिंदुत्व, अयोध्या राममंदीर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेंव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं ? तुम्ही स्वत: फोन करुन अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असे सांगितले. मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते, आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितले की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वतः परत घेऊन या. शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितले की सीएम साहेबांचा फोन आला होता आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेज परत घेतले आणि आपले घर गाठले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हते मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामलल्लांचं दर्शन का घेऊ दिले नाही?

साहेब, जेव्हा आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेंव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते, मतदारसंघातली कामं करत होते. निधी मिळाल्याची पत्र नाचवत होते. भुमीपुजन आणि उद्घाटन करत होते. तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत होते. त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो?

आपला

संजय शिरसाट

Updated : 23 Jun 2022 7:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top