Home > Politics > एकनाथ खडसे पुन्हा भाजपवासी होणार? गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

एकनाथ खडसे पुन्हा भाजपवासी होणार? गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत भाजपला राम-राम केला होता. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींवरून एकनाथ खडसे पुन्हा भाजपवासी होणार? अशी चर्चा रंगली होती. त्यातच गिरीश महाजन यांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे.

एकनाथ खडसे पुन्हा भाजपवासी होणार? गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण
X

भाजप नेते आणि तात्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत हातात घड्याळ बांधले. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मात्र नाशिक येथे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे एका मंचावर आले होते. यावेळी एकदाच बसू आणि काय ते मिटवून टाकू, असं एकनाथ खडसे देवेंद्र फडणवीस यांच्या कानात म्हणाल्याचा खळबळजनक दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे नाशिक येथे महानुभव पंथाच्या कार्यक्रमात एकत्र आले होते. यावेळी कोणतेही राजकीय भाष्य करणार नसल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले होते. मात्र यावेळी एकनाथ खडसे देवेंद्र फडणवीस आणि माझ्या कानात म्हणाले की, एकदा बसू आणि काय तो विषय मिटवून टाकू. पण एकनाथ खडसे यांना कोणता विषय मिटवायचा आहे? त्यांच्या म्हणात नेमकं काय सुरू आहे? याबाबत गर्दीत असल्यामुळे विचारता आलं नाही. मात्र एकनाथ खडसे यांना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बसून नेमकं काय मिटवून घ्यायचं आहे? यावरून राजकारणात चर्चा रंगली आहे.

दरम्यान एकनाथ खडसे यांनी खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. त्यावरून एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरणही दिले. मात्र दुसरीकडे गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे आणि अमित शहा यांची भेट झाली नसल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. दुसरीकडे एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांचे अमित शहा यांच्याशी फोनवरून बोलणं झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकनाथ खडसे पुन्हा भाजपवासी होणार का? अशी चर्चा रंगली आहे. मात्र एकनाथ खडसे यांनी या सर्व दाव्यांचे खंडण केले आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत नाव पाठवण्यात आले होते. मात्र ती यादी तशीच धुळखात पडून होती. त्यामुळे राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देत निवडून आणले. त्यामुळे एकनाथ खडसे सध्या विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यातच एकनाथ खडसे विधानपरिषद सदस्य होण्यापुर्वी त्यांना आमदारकी मिळाल्यास महाविकास आघाडीकडून त्यांना मंत्रीपद देण्याविषयीही चर्चा रंगल्या होत्या. मात्र 20 जून रोजी विधानपरिषद निवडणूकीनंतर राज्यात झालेल्या सत्तानाट्यामुळे राज्यात सत्ताबदल झाला आणि एकनाथ खडसे यांच्या मंत्रीपदावर पाणी पडल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानात एकदा बसून काय ते मिटवून टाकू? असं म्हटल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला. त्यामुळे एकनाथ खडसे पुन्हा भाजपवासी होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.Updated : 3 Oct 2022 1:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top