Home > Politics > एकनाथ खडसेंचे टेन्शन वाढलं

एकनाथ खडसेंचे टेन्शन वाढलं

एकनाथ खडसेंचे टेन्शन वाढलं
X

एकनाथ खडसे यांच्यामागे ED चा ससेमिरा लागला असतानाच आता एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात जळगाव जिल्ह्यात दुध संघाच्या निवडणूकीचे रण पेटले आहे. त्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत होत्या. मात्र आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जळगाव जिल्हा दुध संघाची निवडणूक रंगात आली आहे. त्यातच संस्थेचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली. त्यामुळे राजकीय व सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष ह्या एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आहेत. त्यामुळे हा एकनाथ खडसे यांच्या साठी मोठा धक्का मानला जात आहे . या गुन्ह्यात अध्यक्षा मंदाकिनी खडसे , काही संचालक व कर्मचार्‍यांच्या नावाचा समावेश असल्याने आता आणखी कुणाला अटक होते, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

जिल्हा दुध संघातील अपहार प्रकरणी सोमवारी रात्री संस्थेचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना शहर पोलीस स्थानकाच्या पथकाने अटक केली. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. तपासणी झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. लिमये यांच्या सोबत हरी रामू पाटील, किशोर काशिनाथ पाटील आणि अनिल हरीशंकर अग्रवाल यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, थेट संस्थेच्या कार्यकारी संचालकांनाच अटक केल्यानंतर या प्रकरणात अन्य अटकसत्र होण्याची शक्यता देखील बळावली आहे.

दूध संघात नेमका काय आहे गुन्हा दाखल

जिल्हा दूध संघाबाबत अपहार व चोरी झाल्याबाबत एकुण तीन तक्रारी आलेल्या होत्या. यातील जबाबानुसार दुध संघात एकुण १ कोटी १५ लाख रूपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा दुध संघातून सुमारे १४ टन बटर (लोणी) व ८ ते ९ टन म्हशीच्या दुधाची भुकटी (मिल्क पावडर ) सुमारे २ ते २.५ कोटी रुपये मुद्देमालाची परस्पर विल्हेवाट लावुन टाकण्यात आलेली आहे. सदरची विल्हेवाट ही दुध संघाचे चेअरमन, कार्यकारी संचालक काही मोजके कर्मचारी यांनी अंत्यत हुशारीने व नियोजन पद्धतीने लावलेली आहे. सदरचा अर्ज हा सीआरपीसी १५४ अन्वये फिर्याद नोंदवावी याबाबत अर्जात नमुद केलेले होते. या संदर्भात संस्थेचे कार्यकारी संचालक मनोज गोपाळ लिमये (वय-५९ वर्ष, रा. दुध संघ कँपस जळगाव) यांनी या प्रकरणी अपहार झाला नसून चोरी झाली असल्याचा दावा केला होता. या अनुषंगाने त्यांनी अनंत अशोक अंबीकर, महेंद्रा नारायण केदार या कर्मचार्‍यांना निलंबीत केले होते. यानंतर पोलीसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली होती. यानंतर आज या गुन्ह्यातील प्रमुख संशयित असणार्‍या मनोज लिमये यांना गजाआड करण्यात आले आहे.

खडसेंच्या पत्नीवर अटकेची तलवार

या गुन्ह्यातील मूळ फिर्यादीत संस्थेचे कार्यकारी संचालक मनोज लिमये, अध्यक्षा मंदाकिनी एकनाथ खडसे तसेच काही संचालक व मोजक्या कर्मचार्‍यांनी अपहार केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यामुळे लवकरच याच प्रकरणी मोठी कार्यवाही होण्याची शक्यता देखील असून यात अजून काही जणांना म्हणजेच दूध संघाच्या अध्यक्षा एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना ही आता अटक होऊ शकते. याबाबत आता जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.

Updated : 15 Nov 2022 11:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top