Home > Politics > मुंबई शहरातील लोक जाती धर्माला पाहून मतदान करतात का?

मुंबई शहरातील लोक जाती धर्माला पाहून मतदान करतात का?

Do people in Mumbai vote based on caste and religion?

मुंबई शहरातील लोक जाती धर्माला पाहून मतदान करतात का?
X

मुंबई महापालिकेच्या तोंडावर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. प्रत्येक निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात. जिंकण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या मुद्यांना हात घालत असतो. विकासाची प्रलोभणं दाखवली जातात. मात्र, भारतीय लोक नक्की विकासाला मतदान करतात की जाती धर्माला? महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विकासाबरोबरच अनेक गावात जात फॅक्टर महत्त्वाचा ठरला. ग्रामीण भागात निवडणुकीत जात हा फॅक्टर महत्त्वाचा मानला जातो. मात्र, शहरी मतदार उमेदवाराची जात, धर्म पाहून मतदान करतात का? याचा विचार कधी होतो का?

सर्वसाधारण पणे ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी मतदारांमध्ये शिक्षणाचं प्रमाण अधिक असतं. शिक्षण झालेले लोक मतदान करताना विकासाचा विचार करतात. असा एक सर्वसाधारण समज आहे. त्यामुळं शहरी मतदार जात, धर्म पाहून मतदान करतो की विकास पाहून… असा प्रश्न उपस्थित होतो.

देशाची राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. मुंबई शहर हे विविध जाती धर्माची लोक राहणारं देशातील सर्वात मोठं शहर आहे. त्यामुळं मुंबईच्या निवडणुकीत मतदार जात, धर्म पाहून मतदान करतात की विकास पाहून...,? मुंबई महानगरपालिकेत तिकिट देताना जाती धर्माला किती महत्त्व आहे? या संदर्भात आम्ही काही तज्ज्ञांची मत जाणून घेतली.

सर्वसाधारणपणे नवीन प्रभागरचनेनुसार ५४ ते ५५ हजार लोकांमागे एक नगरसेवक असतो. मुंबई महानगरपालिकेत २२७ प्रभाग आहेत. या प्रत्येक प्रभागातून एक नगरसेवक निवडून दिला जातो. २०१७ च्या मुंबई महानगरपालिकेच्य़ा निवडणुकीत ९५ लाख मुंबईकरांना मतदान करण्याचा हक्क होता. यामधील ५२.१७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

मुंबईमध्ये जात, धर्म प्रांत यांचा विचार करता नेहमी दलित आणि मुस्लीम आणि परप्रांतीय मतदार चर्चेत राहतो. मुंबई महानगरपालिकेच्या २२७ मतदारासंघापैकी ४० ते ५० मतदारसंघात मुस्लीम लोकवस्ती आहे. यामध्ये माहिम, कुर्ला, भायखळा, नागपाडा, गोवंडी, शिवाजीनगर, चांदवली, वांद्रे (बेहराम पाडा), मालाड-मालवणी, चिंता कॅम्प (अनुशक्तीनगर), कुर्ला पश्चिम, बेहराम बाग, पायधुनी, डोंगरी, विक्रोळी बंमखाना या भागांचा समावेश आहे. सध्या मुंबई महानगरपालिकेत 22 मुस्लीम नगरसेवक आहेत. विशेष बाब म्हणजे यातील बहुतांश नगरसेवक मुस्लीम बहुल वस्त्यातीलच आहेत.

मुंबईतील दलित वस्त्यांचा विचार केला तर मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, चेंबूर पीएल लोखंडी मार्ग, चेंबूर वाशी नाका, लालडोंगर, घाटकोपर रमाबाई, सिद्धार्थ कॉलनी, पायधुनी, डोंगरी, नागपाडा, भायखळा, मलाड मालवणी, गोरेगाव (भगतसिंह नगर), वडाळा, या भागांचा समावेश होतो.

या भागात उमेदवार देताना बहुतांश राजकीय पक्ष दलित अथवा मुस्लीम उमेदवारास प्राधान्य देतात. असं दिसून येतं. विशेष बाब म्हणजे मुंबईतील बहुतांश दलित वस्त्या आणि मुस्लीम वस्त्या समानच आहेत. म्हणजे मुस्लीम आणि दलित समाज एकत्र राहत असल्याचं दिसून येते.

या संदर्भात आम्ही दलित वस्तीमध्ये सामाजिक काम करणारे जयवंत हिरे यांच्याशी बातचित केली. मुंबईतील रमाबाई आंबेडकरनगर मध्ये राहणारे हिरे सांगतात...

बहुतांश दलित उमेदवार हे आरक्षणामुळे दिले जातात. किंवा एखाद्या प्रभागात दलित लोक जास्त असतील तर त्याला प्रस्थापित राजकीय पक्ष उमेदवारी देतात. तो विकास करतो किंवा त्याला दलितांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत माहिती आहे. किंवा तो दलित विचारधारेशी प्रामाणिक आहे. असा विचार या मागे नसतो. फक्त दलित आहे. पैसा आहे. प्रस्थापित आहे. याचा विचार करुनच उमेदवारी दिली जाते. त्याला शिवसेनेचं हिंदूत्वाचा किंवा भाजपच्या हिंदूत्वाशी काही देणं घेणं नसतं.

दलित समाज सवर्ण समाजाला ही मतदान करतो. कारण तो असंघटीत असतो. मात्र, मुस्लीम समाज फक्त मुस्लीम उमेदवारांना मतदान करतांना बहुतांश वेळा पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने मुस्लीम मतदार संघटीत असतो. दलित वस्तीतील लोक बहुतांश वेळा उमेदवाराची जात पाहून मतदान करतात.

राजकीय पक्ष देखील सामाजिक संघटनांमध्ये चांगलं काम करणाऱ्या दलित कार्यकर्त्यांना उमेदवारी देत नाहीत. त्यांना प्रस्थापित उमेदवार हवा असतो.

असं मत हिरे यांनी व्यक्त केलं आहे.

ज्येष्ठ पत्रकार किरण सोनवणे सांगतात... शहरी भागातील मतदार शिकलेला आहे. यात दुमत नाही. मात्र, शिक्षण झालं म्हणजे व्यक्ती जाती धर्माचा विचार न करता विकासाचा विचार करतो असं नाही. शिक्षण आणि मतदान या वेगवगेळ्या गोष्टी आहेत. अनेक शिकलेली लोक जात धर्माचा विचार करून मतदान करताना... यामुळे विकासाचा मुद्दा मागे पडतो. राम मंदिराचा विचार करून मतदान करणं, किंवा मागणं हा देखील धार्मिकच मुद्दा आहे. यामध्ये शहरी मतदार पुढे दिसतो. दुर्दैवाने अशा मुद्द्यामुळे विकासाचा मुद्दा मागे पडतो.

असं मत ज्येष्ठ पत्रकार किरण सोनवणे यांनी व्यक्त केलं आहे.

ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात...

एखाद्या व्यक्तीने जर चांगलं काम केलं असेल तर लोक त्याला निवडून देतात. त्यासाठी राजकीय पक्षाने जाती धर्माच्या बाहेर जाऊन विचार करायला हवा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी असा विचार केलेला दिसून येतो. मात्र, कॉंग्रेस आणि भाजप जाती धर्माचा विचार करणारे पक्ष आहे. भाजप शक्यतो मुस्लीम समाजातील व्यक्तीला उमेदवारी देण्याचे टाळतो. तर कॉंग्रेसमध्ये उमेदवारी देताना जातीचा मोठ्या प्रमाणात विचार केलेला दिसून येतो.

आजही कॉंग्रेसमध्ये तेच होतं. मात्र, शिवसेनेमध्ये तसं होत नाही. शिवसेनेने मनोहर जोशी यांच्यासारख्या ब्राह्मण व्यक्तीला राज्याचं मुख्यमंत्री केलं. तर कॉंग्रेसने विठ्ठलराव गाडगीळ यांना ब्राह्मण असल्यानं पुढं येऊ दिलं नाही.

प्रस्थापित राजकीय पक्षांनी उमेदवार देताना दलित लोकवस्ती असलेल्या भागात ब्राह्मण उमेदवार दिला किंवा ब्राह्मण लोकवस्ती असलेल्या भागात दलित उमेदवार दिला तर कुठं बिघडतं. मात्र, दुर्दैवाने भारतात असं कुठंही होताना दिसत नाही. असं मत हेमंत देसाई यांनी व्यक्त केलं.

ते म्हणतात... प्रत्येक पक्षाची आपली एक पॉलिस असते. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात जातींचा अधिक विचार केला जातो.

ग्रामीण भागांमध्ये उमेदवाराची जात महत्त्वाची असते. मात्र, शहरी भागात जात धर्म अधिक विकास असा विचार केला जातो. मुंबई च्या निवडणुकीत प्रांतवाद, भाषावाद हे मुद्दे देखील महत्त्वाचे ठरतात.

आपल्या देशात कोणत्याही निवडणुकीत दुर्दैवाने विकासापेक्षा जात धर्म, भाषावाद, प्रांतवाद याचा विचार अधिक होताना दिसतो. अलिकडे थोड्या फार प्रमाणात हे स्वरुप बदलताना दिसत आहे.

असं मत हेमंत देसाई यांनी व्यक्त केलं आहे.

ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे यांच्याशी बातचित केली. ते सांगतात...

मुंबई शहरात विविध जात, धर्माच्या, प्रांतीक लोक वेगवेगळ्या लोकवस्त्या राहतात. पश्चिम महाराष्ट्रातील गिरणी कामगारांच्या लोकवस्ती वेगळ्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील लोक वेगळ्या भागात तर कोकणी लोक वेगवगेळ्या भागात राहतात. उत्तर प्रदेश, बिहारचे लोक देखील मुंबईत राहतात. त्यांची देखील एक वेगळी वस्ती आहे. गुजराती लोक त्यांच्या वेगळ्या लोकवस्तीचा आग्रह धरताना दिसतात.

यांचं मूळ स्वत:च्या प्रदेशाचं अस्तित्व टिकवणं असतं. या सर्व बाबी भावनिकतेशी जोडलेल्या असतात. आपली भाषा टिकवून ठेवणं. आपली ओळख टिकवून ठेवणं हे त्यांना गरजेचं वाटतं. यातूनच स्थानिक नेतृत्व पुढं येतं. मराठी बहुल, उत्तर भारतीय़ नेतृत्व, बिहारी नेतृत्व निर्माण होतं. आणि लोक त्या नेतृत्वाला मतदान करतात. हे सर्व नैसर्गिक आहे. त्यामुळं या ठिकाणी राजकीय पक्ष उमेदवारी देताना या लोकांचाच विचार करतात. हे सर्व स्वाभाविक आहे. आपण या ठिकाणी जातीला, धर्माला मतदान करतात. असं म्हणतो.

मात्र, अलिकडच्या काळात जातीयवाद, धर्मवाद, प्रांतवाद आता जरा मागे पडला आहे. अलिकडे मध्यमवर्गीय जरा विकासाच्या दृष्टीने विचार करताना दिसतो. हा वर्ग आता नगरसेवकाला थेट व्यवहारीक प्रश्न विचारताना दिसतो. तुम्ही आमच्या कामाला आले का? तुम्ही अमुक अमुक वेळेस मदतीला धावले का? मदतीला धावून जाणारा मसिहा अशी काही स्थानिक प्रतिनिधींची ओळख झालेली असते. तेव्हा लोक या मसिहाला मतदान करतात. अशा वेळी जात धर्माचा विचार केला जात नाही. वसई विरार मतदार संघातील लोक जात धर्म विसरून हितेंद्र ठाकूर यांना मतदान करताना आपण पाहिलं आहे.

तर दुसरीकडे आता लोकसभा, विधानसभा निव़डणुकीत ज्या मुद्द्यावर मतदान मागितलं जातं. असे विषय ग्रामपंचायत निवडणुकीत देखील येतात. आता ग्रामपंचायत निवडणुकीत राम मंदिरासारख्या मुद्द्यावर भाजप सारखे राष्ट्रीय पक्ष मत मागताना दिसून येतात.

असं मत साठे यांनी व्यक्त केलं आहे.

एकंदरिंत भारतीय मतदार, राजकीय पक्ष जाती धर्माला राजकारणामध्ये महत्त्व देताना दिसतात. मात्र, अलिकडे जात धर्म अधिक विकासाचा मुद्दा असा विचार मतदार करत असल्याचं दिसून येतं.

Updated : 30 Jan 2021 3:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top