Home > Politics > 'एक आण्याचा गांजा मारला की, भरपूर कल्पना सुचतात'; सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका

'एक आण्याचा गांजा मारला की, भरपूर कल्पना सुचतात'; सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका

एक आण्याचा गांजा मारला की, भरपूर कल्पना सुचतात; सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका
X

मुंबई : लोकशाही ,घटना, कायदा 'त्यांना' मान्य नाही. विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री ते स्वीकारत नाहीत. राजकारणाचा हा नवा 'पदर' बरेच काही सांगून जातो, अशा शब्दात सामनाच्या आजच्या अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर भाजपकडून भाष्य करत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती, या टीकेला प्रत्युत्तर देताना सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की , भारतीय जनता पक्षाने ठाकरे यांच्या जोरदार भाषणवर बेंबीच्या देठापासून बोंबा मारायला सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच कसे ? अशी 'अलोकशाही' भूमिका घेऊन मनातील भडास बाहेर काढली. उद्धव ठाकरे यांनी एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू असे सांगितले होते पण ते स्वतः झाले असा आक्षेप घेणारे फडणवीस आणि चंद्रकांत पाटील कोण ? उद्धव ठाकरे हे शिवसैनिक आहेत आणि ते काही परकीय देशातील राजकीय पक्षाचे सदस्य नाहीत. असा घणाघात सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर लाखोंच्या उपस्थितीमध्ये वाजत गाजत शपथ घेतली लोक झोपेत आणि गुंगीत असताना लपून-छपून काड्याकुलपात शपथ घेतली नाही असा टोला सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांना लगावण्यात आला. सोबतच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले या मळमळीत तसा अर्थ नाही. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून तुमच्याच राज्यपालांनी शपथ दिली व त्या घटनात्मक विधीस स्वतः फडणवीस उपस्थित होते. शपथविधीचा झगमगता सोहळा पाहून त्यांचे डोळे दिपले असतील, असं सामनातून म्हटलं आहे.

केंद्र सरकारने राज्य सरकारांच्या हक्क आणि अधिकारांचे हनन चालवले आहे. राज्यांना काम करू द्यायचे नाही विशेषत: ज्या राज्यात भाजपचे मुख्यमंत्री नाहीत तेथे तर केंद्रिय तपास यंत्रणांचा मुक्त हैदोस सुरू आहे असं सामनातून म्हटलं आहे.

त्याचबरोबर पडद्या ऐवजी 'पदरां' चा वापर भाजपने सुरू केला आहे, आपल्या देशात हे नवे पायंडे भाजपने घातले आहेत. भाजपने महाराष्ट्राची सत्ता गमावून दोन वर्ष झाली त्या धक्क्यातून त्यांनी सावरायला हवं असं सामनातून म्हटलं आहे.

भाजपचे लोक दसरा मेळाव्यानंतर बेधुंद पद्धतीने शिमगा करत आहेत बेताल आरोप करत आहेत हे बरे नाही. हे लोकं नशेत वगैरे बोलत आहेत काय? याचा तपास व्हावा 'एक आण्याचा गांजा मारला की, भरपूर कल्पना सुचतात' असा टोला सामनातून करण्यात आला.

केंद्रातील भाजप धुरीणांना 'विरोधी पक्ष' , 'विरोधी सूर' या संसदीय लोकशाहीच्या संकल्पनाच मान्य नाही, मात्र महाराष्ट्राला लोकशाहीची परंपरा आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने त्यांचे काम निर्भयपणे करत राहावे. या मताचे आम्ही आहोत असं सामनाच्या अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी सुनावले आहे.

Updated : 18 Oct 2021 3:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top