Home > Politics > कोण होणार पंजाबचा कॅप्टन; सुनिल जाखड, सिद्धू की बाजवा?

कोण होणार पंजाबचा कॅप्टन; सुनिल जाखड, सिद्धू की बाजवा?

कोण होणार पंजाबचा कॅप्टन;  सुनिल जाखड, सिद्धू की बाजवा?
X

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर रविवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. दरम्यान, या बैठकीमध्ये, नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचं समजतंय. मात्र, नवीन मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नेत्यांची नावे प्रामुख्याने पुढे येत आहेत.

पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड, पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रताप सिंह बाजवा आणि माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू रवनीत सिंग बिट्टू हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. यासोबतच, नवज्योतसिंग सिद्धू यांना देखील मुख्यमंत्री पदाचे दावेदार असण्याची शक्यता आहे. दरम्यान, या नावांव्यतिरिक्त देखील मुख्यमंत्रीपदाचे अनेक दावेदार आहेत. ज्यामध्ये काँग्रेसच्या राज्यसभा खासदार अंबिका सोनी आणि राज्यमंत्री सुखजिंदर रंधावा यांचा समावेश आहे. मात्र, अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्री पद नाकारलं आहे.

या संदर्भात बोलताना पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष पवन गोयल म्हणतात यांनी सांगितलं "हरीश रावत आणि अजय माकन यांच्यासोबत काल (18 सप्टेंबर) आमदारांची बैठक झाली. त्यानंतर आता सोनिया गांधी जो निर्णय घेतली तो अंतिम असेल असा ठराव संमत करण्यात आला आहे. आणि त्यांचा निर्णय तुम्हाला आज कळेल."

दरम्यान, असं देखील बोललं जात आहे की, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत घेतलेल्या बैठकीमध्ये, पंजाबमधील नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत चर्चा केली. तसेच, रात्री उशिरा एका बैठकीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि अंबिका सोनी यांना राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पाहिलं गेलं. मात्र, अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्री होण्यास नकार दिला आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही नावं नवीन मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. दरम्यान, शनिवारी पंजाब काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला 78 आमदार उपस्थित होते, त्यापैकी बरेच कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे समर्थक होते. मात्र, फक्त कॅप्टन अमरिंदर आणि एक अन्य आमदार या बैठकीला उपस्थित नव्हते. पंजाबमध्ये काँग्रेसचे एकूण 80 आमदार आहेत.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत, सोनिया गांधी यांना मुख्यमंत्रिपदी हव्या त्या व्यक्तीची नियुक्ती करण्याचे एकमताने अधिकृत करण्यात आले असले तरी आता प्रश्न असा आहे की, पंजाबची खुर्ची कोणाला मिळणार ?

दरम्यान, पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड हे अमरिंदर सिंग यांचे जवळचे मानले जातात. तर जाखड यांनी ट्विट करत राहुल गांधींचे कौतुक केले आहे. ते म्हणतात - त्यांनी काँग्रेसचे संकट खूप चांगल्या प्रकारे सोडवले आहे.

शीख-हिंदू समीकरण

पंजाबमधील हिंदू-शीख बहुलवादाचा मुद्दा आणि ज्यापद्धतीने कॉंग्रेस सारखा राजकीय पक्ष काम करतो, त्यानुसार, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष शीख, तर मुख्यमंत्री हिंदू आणि मुख्यमंत्री शीख तर प्रदेश अध्यक्ष हिंदू असे असतात. त्यानुसार, सुनील जाखड़ जेव्हा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष होते तेव्हा कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्री होते. मात्र, त्यांनतर जेव्हा त्यांना काढून नवज्योतसिंग सिद्धू यांना प्रदेश काँग्रेसचे प्रमुख बनवण्यात आले, तेव्हा असं देखील म्हंटल गेलं की,जाखड यांना मुख्यमंत्री बनवायला हवं. त्यामुळे जाखड़ यांना मुख्यमंत्री केले जाईल का, हा मोठा प्रश्नच आहे.

मात्र, काही लोक म्हणतात की नवज्योतसिंग सिद्धू यांनी एक दीर्घ लढाई लढली आहे आणि कर्णधाराला काढून टाकलं आहे, त्यामुळे सिद्धू यांनी त्या खुर्चीवर बसवले पाहिजे. दरम्यान, काँग्रेसचे सुमारे 50 आमदार सिद्धू यांना पाठिंबा देण्यास तयार असल्याचं समजतंय. पण निवडणुकीच्या तोंडावर, एक अननुभवी आणि गर्विष्ठ व्यक्तीची काँग्रेस मुख्यमंत्रिपदी नियुक्त करेल का ? काय काँग्रेस हा डाव खेळेल ?

Updated : 19 Sep 2021 7:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top