Home > Politics > 'ये है मन की बात, मोदी है अदानी के साथ', काँग्रेसचा हल्लाबोल

'ये है मन की बात, मोदी है अदानी के साथ', काँग्रेसचा हल्लाबोल

हिंडेनबर्गने अदानी समूहावर घोटाळ्याचे आरोप केले असतानाच आता काँग्रेसने थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

ये है मन की बात, मोदी है अदानी के साथ, काँग्रेसचा हल्लाबोल
X

भारत जोडो यात्रेनंतर देशभरात काँग्रेसमध्ये उत्साह भरण्याचे काम राहुल गांधी यांनी केले. त्याचे परिणाम आता राज्यात दिसू लगाले आहेत. धुळे शहरामध्ये मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलन केले. एलआयसी आणि एसबीआय कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.

एलआयसी आणि स्टेट बॅंक ऑफ इंडिया या सार्वजनिक वित्तीय संस्थांना अदानी उद्योग समुहात गुंतवणूक करण्यास भाग पाडून सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान करणार्‍या केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात कॉंग्रेसने सोमवारी राज्यव्यापी आंदोलन केल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.

धुळे शहरात देखील एलआयसी आणि एसबीआय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अदानी आणि मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

अदानी उद्योग समुहामध्ये एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया व सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांना कोट्यवधी रूपये गुंतवण्यात मोदी सरकारने भाग पाडले. एलआयसीचे २९ कोटी गुंतवणूकदार व स्टेट बँकेच्या ४९ कोटी खातेदारांचा कष्टाचा पैसा परत मिळेल का? अशी भिती आता निर्माण झाली आहे.

एल.आय.सी व स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या देशाचे गौरव आहेत. या वित्तीय संस्थामध्ये सर्वसामान्य, मध्यमवर्ग, नोकरदार, छोटे व्यापारी यांनी आपल्या मेहनतीचा पैसा गुंतवलेला आहे. परंतू मोदी सरकारने अदानीच्या कंपन्यांमध्ये हा पैसा बळजबरीने गुंतवला आहे, असा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला. अदानी उद्योग समुहातील गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी, यासाठी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने रस्त्यावर उतरुन यावेळी आंदोलन करण्यात आले.

Updated : 7 Feb 2023 6:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top