Home > Politics > सरकार कोसळल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांची फेसबुक पोस्ट व्हायरल

सरकार कोसळल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांची फेसबुक पोस्ट व्हायरल

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही फेसबुक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पाहूयात काय म्हणाले जितेंद्र आव्हाड...

सरकार कोसळल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांची फेसबुक पोस्ट व्हायरल
X

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सरकार अल्पमतात आले होते. तर सर्वोच्च न्यायालयाने बहुमताच्या चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिल्याने मुख्यंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भावनांना वाट मोकळी करून दिली.

जितेंद्र आव्हाड फेसबुक पोस्ट करून म्हणाले की, माझा अडीच वर्षांचा मंत्री म्हणून कार्यकाळ हा शरद पवार यांच्या आशीर्वादामुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माझ्या दृष्टीने तरी चांगला गेला. खूप चांगले निर्णय घेता आले. लोकोपयोगी कामे करता आली. मंत्री म्हणून काम करीत असतांना या अडीच वर्षांत गृहनिर्माण विभागाचे माझे पहिले सचिव संजीव कुमार, त्यानंतरचे गृहनिर्माण सचिव श्रीनिवासन आणि आत्ताचे सचिव मिलिंद म्हैस्कर त्याचबरोबर म्हाडाचे सचिव डिग्गीकर, म्हाडाचे मुंबई विभागाचे मुख्य अधिकारी म्हसे, झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी सतिश लोखंडे, रिपेअर बोर्डाचे अधिकारी डोंगरे यांचे माझ्या सर्व निर्णयांमध्ये अभूतपूर्व योगदान होते. माझे यश मोजले तर त्यामध्ये माझं स्वत:चं योगदान 1 टक्का इतकेच आहे. बाकी ह्या सगळ्या अधिका-यांचे योगदान आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सगळ्यांचे योगदान हे 99 टक्के आहे.

मंत्री पदाची जबाबदारी असताना अधिका-यांच्या सहका-याशिवाय व त्यांच्या ज्ञानाचा उपयोग केल्याशिवाय काम करणे हे निव्वळ अशक्य असतं. त्यांचा अनुभव, त्यांचे ज्ञान हे वेळोवेळी उपयोगी पडले. त्यामुळेच जे काही निर्णय घेता आले, ते योग्यरीतीने पुढे नेण्यात मी यशस्वी झालो.

परत एकदा गृहनिर्माण विभाग, म्हाडा, झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरण यामधील सर्व अधिका-यांचे, कर्मचारी वर्गाचे, माझे वाहन चालवणारे माझे सारथी, माझ्या बरोबर फिरणा-या चोपदारापासून, माझ्या शासकीय निवासस्थानी येणा-या प्रत्येकाची नाष्ट्याची, जेवणाची व्यवस्था करणारे स्वयंपाक घरातील माझे कर्मचारी. कारण माझ्याकडून कधी कोणी अडीच वर्षांत उपाशीपोटी गेला असे कधीच झाले नाही. या सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानतो. कारण यांच्यामुळेच मला सहज काम करता आले.

सत्ता येते, सत्ता जाते पण, ह्या सगळ्यांनी केलेले सहकार्य मी कधीच विसरणार नाही. त्यामुळे त्याबद्दल फारसे काही न बोलता आपण दिलेल्या सहका-याबद्दल आपले आभार मानतो आणि हो आणि कुणाचे मन दुखावले असेल तर मोठ्या मनानी माफ करावे, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.




Updated : 29 Jun 2022 5:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top