Home > Politics > मुख्यमंत्री शिंदे झाले `कॉमन मॅन` ;स्पेशल प्रोटोकॉल नाकारला

मुख्यमंत्री शिंदे झाले `कॉमन मॅन` ;स्पेशल प्रोटोकॉल नाकारला

मुख्यमंत्री शिंदे झाले `कॉमन मॅन` ;स्पेशल प्रोटोकॉल नाकारला
X

सर्वसामान्य नागरीक आणि वाहनचालकांचा खोळंबा नको म्हणुन मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येणार नाही त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप वाचणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे स्पष्ट आदेशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून याबाबतचे निर्देश दिले आहेत. यापुढे मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गीकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाणार नाही याची खबरदारी घ्या अशी सूचना त्यांनी दिली आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार असून व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य असल्याचे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री या नात्याने सतत प्रवास करावा लागतो. त्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रवास मार्गावरील वाहतुक रोखण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच या बंदोबस्तासाठी अनेक पोलीस तैनात केले जात असल्याने पोलीस दलावर कामाचा ताणही वाढत असल्याचे गेले तीन चार दिवस प्रवास करताना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो. अतिमहत्वाच्या कामांसाठी निघालेल्या लोकांचा खोळंबा होतो. रुग्णवाहिका त्या कोंडीत अडकून पडली तर रूग्णाच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो . त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची सुत्रं हाती घेतल्यानंतर आपल्या या प्रवासाचा नाहक त्रास वाहनचालकांना नको, अशी मुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका आहे.

Updated : 8 July 2022 11:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top