Home > Politics > #RajyaSabha छत्रपतीच्या उमेदवारीचा वाद क्षमेना : राऊतांचा फडणीसांवर पलटवार

#RajyaSabha छत्रपतीच्या उमेदवारीचा वाद क्षमेना : राऊतांचा फडणीसांवर पलटवार

#RajyaSabha छत्रपतीच्या उमेदवारीचा वाद क्षमेना  : राऊतांचा फडणीसांवर पलटवार
X

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतील माघारीनंतर महाविकास आघाडी विरोधात भाजप अशी आरोपपत्र्यारोपांची फैरी सुरु झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही असा आरोप केला होता. त्यावर श्रीमंत शाहू महाराज यांनी राज्यसभा निवडणूक लढवणे हा संभाजीराजेंचा व्यक्तिगत निर्णय होता. त्यात छत्रपती घराण्याचा अपमान होण्याचा मुद्दा येत नाही असं स्पष्ट मत शाहु महाराजांनी माडल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी किडक्या डोक्याच्या लोकांनी महाराजांना स्क्रिप्ट तयार करुन दिल्याचा आऱोप केला होता. आरोपाला शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊतांनी उत्तर देऊन छत्रपतींचा असा अपमान करु नका असा पलटवार केला आहे.

आज संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर असून यावेळी ते शाहू महाराजांच्या भेटीसाठी ते न्यू पॅलेसमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेले संजय पवारदेखील उपस्थित होते. या भेटीदरम्यान तसंच नंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे आणि शाहू महाराजांमध्ये फोनवर चर्चा झाली असून कोल्हापूरला आपण भेटीला येऊ असं आश्वासन त्यांनी दिल्याचं सांगितलं आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, "मी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो. मी बऱ्याच वर्षांनी आज कोल्हापुरात आलो. उद्धव ठाकरेंनी सकाळी मला फोन करुन कोल्हापुरात आहात तर महाराजांचे आशीर्वाद घ्या आणि मलाही त्यांच्याशी बोलायचं आहे असं सांगितलं. ठाकरे कुटुंब आणि महाराजांचं एक नातं आहे. याठिकाणी उद्धव ठाकरे, बाळासाहेब आले होते. उद्धव ठाकरेंनी महाराजांना फोनवर मी स्वत: कोल्हापुरात येईन असं सांगितलं आहे. महाराष्ट्रातील आमच्या सामाजिक कार्यात आपल्या शुभेच्छा, आशीर्वाद राहू देत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली".

पुढे ते म्हणाले की, "आम्ही इथे एका आत्मीयतेने आलो आहोत. वयाने आम्ही त्यांच्यापेक्षा फार लहान आहोत. पण या घराण्याविषयी, कुटुंबाविषयी, शाहू महाराजांविषयी प्रबोधनकारांपासून एक नातं आहे, त्या नात्यानं आम्ही इथे येतो. याच्यात कोणतंही राजकारण नाही एवढंच सांगतो".

भेटीनंतर बाहेर आल्यानंतर संजय राऊतांना फडणीवसांनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, "शाहू महाराजांना कोण चुकीची माहिती देणार? छत्रपती आहेत ते..छत्रपतींचा असा अपमान करु नका. चुकीच्या माहितीवर ते बोलणार नाहीत, ते फार ज्येष्ठ आहेत. ज्या घराण्याचा वारसा पुढे घेऊन ते चालले आहेत तिथे चुकीच्या माहितीच्या आधारे वक्तव्यं केली जात नाहीत"

छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शिवसेनेने छत्रपती घराण्याचा अपमान केला, असा आरोप सातत्याने शिवसेनेवर होत होता. मात्र छत्रपती संभाजीराजेंचे वडील छत्रपती शाहू महाराजांची स्वतःच हा आरोप खोडून काढला. त्यानंतर मात्र अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. मला एकाच गोष्टीचं दु:ख आहे की, काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून आदरणीय महाराजांना चुकीची माहिती दिलेली दिसते. त्या लोकांना हे समजत नाही, ज्यांनी अशा प्रकारची माहिती दिली, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता.

देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शाहू महाराज आमचे छत्रपती आहेत. त्या गादीचा एक मोठा मान आहे. त्यामुळे त्यांनी कुठलंही मत व्यक्त केलं असलं तरीही त्यासंदर्भात मी बोलणार नाही. मला वाटतं त्यासंदर्भात स्वत: संभाजीराजेंनी जी प्रतिक्रिया दिली आहे, ती पूर्ती बोलकी आहे. संभाजीराजेंनी स्पष्टपणे ट्विट करून सांगितलं आहे की, मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण सांगतो की, मी जे काही बोललो ते सत्य बोललो. त्यामुळे मला असं वाटतं की, ही बोलकी प्रतिक्रिया आहे.

मला एकाच गोष्टीचं दु:ख आहे की, काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून आदरणीय महाराजांना चुकीची माहिती दिलेली दिसते. त्या लोकांना हे समजत नाही, ज्यांनी अशा प्रकारची माहिती दिली. हे लोक एकीककडे महाराजांना अशी माहिती देऊन संभाजीराजेंना खोटं ठरवत आहेत. दुसरीकडे महाराज आणि युवराजांमध्ये काही तरी अंतर आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं काम जे करत आहेत. त्यांच्या या वागण्याबद्दल मला प्रचंड दु:ख आहे, असं फडणवीस म्हणाले.

आभार मानण्याकरीता युवराज छत्रपती संभाजीराजे मला भेटले होते. त्यापूर्वीच त्यांनी कोणत्याही पक्षाचं तिकीट घेणार नाहीये अशी घोषणा केली होती. मी स्वतंत्र उभा राहणार आहे हे आधीच जाहीर केलं होतं. मला भेटल्यावर त्यांनी हेच सांगितलं. मी कोणत्याही पक्षाचं तिकीट घेणार नाही. माझी अपेक्षा आहे, आमच्या घराण्याची परंपरा पाहता. ज्याप्रकारे मागच्यावेळी राष्ट्रपती कोट्यातून मला राज्यसभेत पाठवलं. तसंच सर्व पक्षांनी मिळून अपक्ष म्हणून मला समर्थन दिलं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

Updated : 29 May 2022 10:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top