Home > Politics > भाजप देणार देवेंद्र फडणवीस यांना धक्का?

भाजप देणार देवेंद्र फडणवीस यांना धक्का?

भाजप देणार देवेंद्र फडणवीस यांना धक्का?
X

2014 ते 2019 या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री पद भुषवलेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांना शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्विकारायला लावून फडणवीस यांची गच्छंती केली. त्यातच भाजप पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना धक्का देणार असल्याची चर्चा राज्यात सुरु आहे.

राज्यात शिक्षक आणि पदवीधर विधानपरिषद निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे भाचे सत्यजित तांबे (satyajeet Tambe) यांनी नाशिक पदवीधर निवडणूकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर यामागे भाजप असल्याची चर्चा आहे. त्यापार्श्वभुमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

प्रकाश आंबेडकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी जे बोलतोय ते देवेंद्र फडणवीस यांना आवडणार नाही. पण भाजप देवेंद्र फडणवीस यांना नाही तर राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe patil) यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे नाशिक पदवीधर निवडणूकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर सत्यजित तांबे यांना भाजप पाठींबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील पारंपरिक विरोधक थोरात विरुध्द राधाकृष्ण विखे पाटील हे आमने-सामने आले आहेत. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांची सुध्दा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे येण्याची आशा आहे. त्यामुळे थोरात विरुध्द विखे (Thorat Vs Vikhe patil) आमने-सामने आले तर भाजप देवेंद्र फडणवीस यांना नाही तर राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करू शकते, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले.

यावरून भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, भाजपचा चेहरा ठरवण्याचा प्रकाश आंबेडकर यांना काय अधिकार आहे? कोण आहेत प्रकाश आंबेडकर? असा सवाल गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी व्यक्त केला.

फडणवीस यांची नाराजी पुन्हा चर्चेत

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद घेण्यास भाग पाडले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा होती. त्यावेळी तत्कालिन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी देवेंद्र फडणवीस नाराज नाहीत. उलट पक्षाचे सच्चे कार्यकर्ते असल्याने त्यांनी त्याग केला आहे, असं म्हटलं होतं. मात्र आता प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यानुसार जर राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपने मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे आणल्यास हा फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे.


Updated : 18 Jan 2023 2:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top