Home > Politics > खासदार गिरीश बापट यांचे निधन

खासदार गिरीश बापट यांचे निधन

माजी मंत्री आणि पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे आज पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. गिरीश बापट हे अनेक दिवसांपासून आजारी होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

खासदार गिरीश बापट यांचे निधन
X

बापट यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे, अशी माहिती जगदीश मुळीक यांनी दिली आहे.गिरीश बापट यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 72 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट हे आजारी होते. कालपासून त्यांची प्रकृती आणखी खालावली होती. त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ICU मध्ये दाखल करण्यात आले होते.

गिरीश बापट हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. गेल्या अनेक वर्षे पुण्यातील राजकारणात त्यांचा दबदबा होता. नुकत्याच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजप पक्ष अडचणीत सापडला असताना गिरीश बापट यांनी आजारपणातही कार्यकर्त्यांच्या मेळावा घेत त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला होता. या मेळाव्याला त्यांच्या नाकात नळी आणि सोबत ऑक्सिजन सिलेंडर होता असे दिसून आले होते.गेले काही दिवस शरद पवार, अमित शहांनी गिरीश बापट यांची त्यांच्या निवास्थानी जाऊन प्रकृतीची विचारपूस केली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून सुरुवात

गिरीश बापट (girish bapat) यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात संघाच्या मुशीतून झाली. त्यामुळे खासदार, मंत्री झाले तरीही गिरीश बापट संघाच्या कार्यक्रमात कायम दिसत. गिरीश बापट यांचा जन्म ३ सप्टेंबर १९५० रोजी पुण्यात झाला. तळेगाव दाभाडेमधून प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग या शाळेत झाले. पुढे त्यांनी पुण्यातीलच बीएमसीसी कॉलेज मधून वाणिज्य शाखेची पदवी घेतली.

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गिरीश बापट यांनी १९७३ साली टेल्कोमध्ये नोकरी सुरु केली. याच काळात त्यांनी कामगारांच्या मागण्यांसाठी अनेकदा लढा दिला. यातूनच त्यांच्या राजकीय जीवनात प्रवास सुरु झाला. दरम्यानच्या काळात देशात आणीबाणी लागली. आणीबाणीच्या विरुद्ध काम केल्यामुळे त्यांना आणीबाणीमध्ये १९ महिन्यांचा कारावास भोगावा लागला. नाशिक जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होत.

पुणे महापालिकेत नगसेवक

आणीबाणीच्या काळात तुरुंगात शिक्षा भोगून आल्यानंतर गिरीश बापट यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. १९८३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले. याचा काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते.

१९९५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवून निवडून आले. पुण्यातील कसबा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर पुढे सलग २०१४ पर्यंत ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले. दरम्यान १९९६ साली त्यांना भाजपाने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. पण बापट यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले.

मंत्री आणि खासदार

राज्यात सलग निवडून येत असताना त्यांनी पुण्यातील भाजपवर आपले वर्चस्व ठेवले होते. २०१४ साली राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्री केलं. सोबतच पुण्याचं पालकमंत्री पदही त्यांना देण्यात आलं होत. २०१९ मध्ये त्यांना खासदारकीचे तिकीट देण्यात आलं. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल ९६ हजार मतांनी पराभव केला.

गेले पाच वर्षे त्यांनी पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतिनिधित्व केले. पण गेल्या काही महिन्यापासून प्रकृती अस्वस्थतेमुळे ते सक्रियपणे काम करू शकत नव्हते. पण पुण्यात कसबा मतदारसंघात लागलेल्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी ते त्याही अवस्थेमध्ये आले होते.

जनसंघापासून राजकारणाला सुरुवात करून नगरसेवक पदापासून बापट यांनी आपला राजकीय प्रवास सुरु केला. तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार आणि खासदार असा मोठा राजकीय प्रवास त्यांनी केला होता.

Updated : 29 March 2023 8:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top