Home > Politics > शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे निर्णय

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे निर्णय

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे निर्णय
X

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३८ आमदारांनी केलेल्या बंडानंतर सरकार संकटात आले आहे. पण त्याचबरोबर आता एकनाथ शिंदे गटाने थेट शिवसेना-बाळासाहेब असे नाव आपल्या गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना भवन येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

या बैठकीत सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत.

१. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर कार्यकारिणीचा विश्वास आहे. पक्षाबाबत निर्णयाचे सर्वाधिकार हे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना आहेत.

२. पक्षाशी गद्दारी करणाऱ्या आमदारांवर कठोर कारवाईचे अधिकार पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्याचा निर्णय झाला.

३. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे नाव कोणीही वापरु शकणार नाही

४. शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचा होता, आहे आणि कायम राहणार आहे.

५. शिवसेना मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी आपली बांधिलकी कायम ठेवणार.

तर या बैठकीत उपस्थितांनी गद्दारांना पक्षाच परत घेऊ नका, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. यावर उत्तर देताना त्यांना परत घेणारच नाही असे उत्तर दिल्याचे सांगितले जाते आहे.

तर आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर जोरदार टीका केली. बाळासाहेबांचे नाव वापरण्यापेक्षा आपल्या बापाचे नाव लावून जिंकून दाखवा, असे आव्हान त्यांनी बंडखोर आमदारांना दिले. शिवसेना हा निखारा आहे, त्यावर पाय ठेवला तर जाळून टाकू असा इशारा त्यांनी दिला. एवढेच नाही तर शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव उधळून टाकू, असाही निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान पक्ष कार्यकारणीची बैठक संपल्यानंतर पदाधिका-यांनी बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. आपण कारवाईचे सर्वाधिकार पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना दिलेत आहेत ते निर्णय घेतील, अशी भूमिका मांडत अरविंद सावंत यांनी पदाधिका-यांना समजावले.

Updated : 25 Jun 2022 4:27 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top