Home > Politics > गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी घेतली शपथ, मोदींचं गुजराती भाषेतून ट्वीट

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी घेतली शपथ, मोदींचं गुजराती भाषेतून ट्वीट

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी घेतली शपथ, मोदींचं गुजराती भाषेतून ट्वीट
X

भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. सोमवारी दुपारी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासारखे नेते उपस्थित होते.

पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर थेट मुख्यमंत्री बनलेल्या भूपेंद्र पटेल यांनी रविवारी संध्याकाळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला. शनिवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे विजय रुपाणी यांनीही भूपेंद्र पटेल यांच्यासोबत राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा गुजराती भाषेत ट्विट करत भूपेंद्र पटेल यांना गुजरातचे नवे मुख्यमंत्री झाल्यानंतर अभिनंदन केले आहे.

दरम्यान, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवारी दुपारी 2:20 वाजता भूपेंद्र पटेल यांना गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी आमंत्रित केले होते. तत्पूर्वी रविवारी भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांचा निर्णय घेण्यात आला होता.

भूपेंद्र पटेल हे घाटलोडिया मतदारसंघातून आमदार आहेत. आनंदीबेन पटेल यांनी त्यांच्यासाठी ही जागा सोडली होती. दरम्यान, भूपेंद्र पटेल हे आनंदीबेन पटेल यांचे जवळचे मानले जातात. तसेच ते पाटीदार समाजातून येतात. ते यापूर्वी अहमदाबाद महानगरपालिका आणि अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे (औडा) अध्यक्ष सुद्धा होते.

नितिन पटेल नाराज आहेत का?

विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर नितीन पटेल गुजरातचे मुख्यमंत्री होतील. असा अंदाज व्यक्त केला जात असताना पक्षाने भूपेंद्र पटेल यांना संधी दिली आहे. त्यामुळं ते नाराज असल्याची चर्चा आहे. यावर ते म्हणाले... 'नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे आमचे मित्र आहेत, ते आमच्यातले आहेत आणि ते आपल्या सर्वांप्रमाणेच कार्यकर्ते आहेत. आम्ही यापूर्वी एकत्र काम केले आहे आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड ही पक्षाने केली आहे. ते माझे मित्र आहेत, मी त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन केले आहे, कोणी आमच्याबद्दल काहीही विचार करो. मीडिया कोणत्याही गोष्टीचा अंदाज लावू शकते. मी सकाळीच त्यांना (माध्यमांना) सांगितले की तुमचे काम अटकळ करणे आहे, पण निर्णय पक्षच घेईल.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर विजय रुपाणी यांनी पदभार स्वीकारला होता. दरम्यान, गेल्या निवडणुकीच्या काही महिने अगोदर आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. मात्र, यावेळी रुपानी यांना गुजरातमधील निवडणुकांच्या जवळपास एक वर्ष आधीच हे पद सोडावे लागले आहे. पुढील वर्षी गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता हा बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Updated : 13 Sep 2021 10:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top