Home > Politics > ठाण्यात शिंदे समर्थकांची बॅनरबाजी...

ठाण्यात शिंदे समर्थकांची बॅनरबाजी...

ठाण्यात शिंदे समर्थकांची बॅनरबाजी...
X

ठाण्यात शिंदे समर्थकांची बॅनरबाजी आणि त्यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. ठाण्यात राष्ट्रवादी विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जोरदार कलगीतुरा पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना आमिष दाखवून आपल्याकडे ओढण्यासाठी दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.


कळव्यात नगरसेवकांनो विकले जाऊ नका, नाही तर गद्दार ठराल, अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले होते. त्यावर आज त्याला उत्तर म्हणून शिंदे समर्थकांनी सुद्धा आज कळव्यात बॅनर लावून राष्ट्रवादीचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाण साधला. लबाड बोका ढोंग करतोय। करून करून भागले आणि प्रवचनाला लागले. विश्वास नाही तुमचा तुमच्याच नगरसेवकांवर, तेल गेलं, तूप गेलं, धुपाटनही राहणार नाही. अशा आशयाचे बॅनर्स कळव्यात लावण्यात आले असून त्याखाली नरेंद्र शिंदे असे नाव लिहण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचे नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा ठाण्यात रंगली आहे आणि या चर्चेनंतर मात्र राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरूवात झाली.आता मात्र यावरून बॅनर युद्ध सुरू झाले आहे. ठाण्यात दर दोन दिवसांनी जितेंद्र आव्हाड आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या नावाचा उल्लेख न करता एकमेकांना बॅनरच्या माध्यमातून लक्ष करत असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. त्यामुळे हे बॅनर युद्ध आणखी काही दिवस असेच सुरू राहणार असून एकमेकांवर त्यातुन कुरघोडी केली जाणार आहे.

ठाण्यातील राष्ट्रवादीचे २२ नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आणि बॅनर युध्द सुरु झाले. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या जवळचे असणारे २२ नगरसेवक त्यातील काही नगरसेवक हे बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या मुंब्र्यात वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या नेत्यांचे फोटो लावले होते. तेंव्हा पासूनच राष्ट्रवादी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर मात्र नगरसेवक पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाल्यावर "नगरसेवकांनो स्वतः ला विकू नका", खोके-बोका आणि" गद्दारी जनता माफ करणार नाही" असे मजकूर असलेले बॅनर लावत बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाला डिवचुन नगरसेवकांना इतर पक्षात प्रवेश करू नये यासाठी बॅनरच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या बॅनर वर कोणत्याही पक्षाचे आणि स्थानिक नेत्याचे नाव, फोटो नव्हते. मात्र हे बॅनर कोणी लावले आणि कोणाच्या सांगण्यावरून लावले हे जनतेला माहीत आहे, असं बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते नरेश म्हस्के यांनी सांगितलं.

Updated : 30 Jan 2023 3:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top