Home > Politics > बच्चू कडू यांच्या विधानावरून आसामच्या विधानसभेत राडा

बच्चू कडू यांच्या विधानावरून आसामच्या विधानसभेत राडा

आमदार बच्चू कडू यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत आसामबद्दल केलेल्या वक्तव्याचे थेट आसामच्या विधानसभेत पडसाद उमटले आहेत.

बच्चू कडू यांच्या विधानावरून आसामच्या विधानसभेत राडा
X

आमदार बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत भटक्या कुत्र्यांवर सुरु असलेल्या चर्चेदरम्यान केलेल्या वक्तव्याचे थेट आसामच्या विधीमंडळात पडसाद उमटले आहेत. त्यामुळे आसामच्या राज्यपालांना अवघ्या 15 मिनिटांमध्ये अभिभाषण आवरावं लागलं.

राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये विधानसभेत भटक्या कुत्र्यांवर चर्चा सुरु असताना बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील भटके कुत्रे आसामला पाठवावेत. कारण तेथील लोक भटक्या कुत्र्याचं मांस खातात. त्यामुळे आसाममध्ये भटक्या कुत्र्यांना मोठी मागणी आहे. याचा विचार करून महाराष्ट्र सरकारने आसाममधील व्यापाऱ्यांशूी संपर्क साधून महाराष्ट्रातील भटके कुत्रे आसामला पाठवावेत, अशी मागणी केली होती. मात्र यानंतर आता बच्चू कडू यांच्या विधानाचे थेट आसामच्या विधीमंडळात पडसाद उमटले आहेत.

बच्चू कडू यांच्या विधानाचा संदर्भ देत आसाममधील (Assam) विरोधी पक्षांच्या आमदारांनी राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान एकच गोंधळ घालत बच्चू कडू यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. मात्र राज्यपाल गुलाबचंद कटारिया (Governor Gulabchand kataria) यांनी गोंधळातही आपले अभिभाषण सुरुच ठेवले. मात्र विरोधी पक्षांच्या जोरदार घोषणाबाजीनंतर राज्यपालांना आपलं अभिभाषण 15 मिनिटांमध्येच थांबवावं लागलं.

काँग्रेसच्या आमदारांनी बच्चू कडू यांच्या विधानाचा संदर्भ देत मुद्दा उपस्थित केला. आमदार कामलख्या डे पुरकायस्थ यांनी बच्चू कडू यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. याबरोबरच अपक्ष आमदार अखिल गोगोई यांनी हा मुद्दा राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी केली. मात्र राज्यपालांनी अभिभाषण सुरु केल्यानंतर विरोधी पक्षाने जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे अखेर राज्यपालांना 15 मिनिटांमध्ये आपलं अभिभाषण आटोपतं घ्यावं लागलं.

Updated : 11 March 2023 3:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top