Home > Politics > आझादीचा अमृत महोत्सव कलंकित आणि गढूळ झाला, शिवसेनेचे टीकास्र

आझादीचा अमृत महोत्सव कलंकित आणि गढूळ झाला, शिवसेनेचे टीकास्र

INS विक्रांत घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने किरीट सोमय्या यांना दिलासा दिला. त्यावर टीका करत शिवसेनेने सामनातून टीकास्र सोडले आहे.

आझादीचा अमृत महोत्सव कलंकित आणि गढूळ झाला, शिवसेनेचे टीकास्र
X

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर INS विक्रांत घोटाळ्याचे आरोप केले होते. तर यामध्ये बाप बेटे जेलमध्ये जाणार असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. मात्र त्यानंतर ईडीने संजय राऊत यांना अटक केली. मात्र किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना उच्च न्यायालयाने दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. त्यापार्श्वभुमीवर सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने न्यायालयावर टीका केली आहे.

सामनाच्या अग्रलेखात म्हटले की, राज्यात शिंदे-फडणवीस महामंडळाचे सरकार आल्यापासून दिलासा घोटाळय़ांची प्रकरणे वाढली आहेत. बुलेट ट्रेनप्रमाणे आता 'दिलासा फास्ट ट्रेन' सुरू करायला हवी. नामचीन सोमय्या बाप-बेटय़ांना म्हणे आय.एन.एस. विक्रांत आर्थिक घोटाळा प्रकरणात दिलासा दिला आहे, असे म्हणत किरीट सोमय्या आणि न्यायालयावर टीका केली आहे.

पुढे अग्रलेखात म्हटले आहे की, पोलिसांचे म्हणणे आहे की, या बाप-बेटय़ांविरुद्ध विक्रांत घोटाळय़ातले ठोस पुरावे सापडत नाहीत. आता हे ठोस पुरावे म्हणजे नेमके काय? महाविकास आघाडीचे सरकार असताना याप्रकरणी जे पुरावे, जबान्या वगैरे घेतल्या होत्या ते काय ठोस पुरावे नव्हते? असा सवाल केला आहे.

आय.एन.एस. विक्रांत भंगारात जाऊ नये, ही राष्ट्राची संपत्ती वाचवायलाच हवी अशा हेतूने सोमय्या बाप-बेटय़ांनी एक मोहीम सुरू केली. सरकारला भीक लागली असेल तर आम्ही जनतेत जाऊन शंभरेक कोटी गोळा करू व राजभवनात जमा करू, पण काहीही करून विक्रांत भंगारात जाऊ देणार नाही. याकामी बाप-बेटय़ांनी चर्चगेटपासून विरारपर्यंत जागोजाग निधी गोळा केला. त्याची छायाचित्रे, व्हिडीओ, बातम्या, सोमय्यांच्या पत्रकार परिषदांतील निवेदने उपलब्ध आहेत, पण हा जमा केलेला निधी सांगितल्याप्रमाणे राजभवनात पोहोचलाच नाही, असा खुलासा खुद्द महाराष्ट्राच्या राजभवनाने केला. यापेक्षा 'ठोस' की काय म्हणतात तो दुसरा पुरावा काय असू शकतो? असाही प्रश्न सामनातून केला आहे. तसेच हा प्राथमिक घोटाळा 50 कोटींच्या वर असावा असे दिसते, पण घोटाळा 57 कोटींचा असो नाही तर 57 रुपयांचा, जनतेच्या पैशांचा अपहार झाला व राजभवनाचे नाव घेऊन ही फसवणूक झाली. मात्र हा गुन्हा ठरत असेल तर काय म्हणायचे? असा सवाल केला आहे.

शेकडो राष्ट्रभक्त नागरिकांनी जागोजाग सोमय्यांच्या 'विक्रांत बचाव' डब्यांत हजार-पाचशेच्या नोटा टाकून विक्रांतला मानवंदना दिली. यापैकी अनेकजण मुंबईच्या आर्थिक गुन्हा विभागात गेले व "आम्ही पैसे दिले" असे सांगितले, तशी निवेदने घेतली गेली. तरीही पोलीस म्हणतात, ठोस पुरावे नाहीत व न्यायालय सांगते घोटाळेबाज असलात तरी दिलासा मिळेल! सोमय्या यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढयाचे अवडंबर माजवून न्याय आणि सत्य यावर चिखलफेक केली. आम्ही सोडून बाकी सगळे घोटाळेबाज, असा दावा हे लोक करतात तेव्हा आश्चर्य वाटते. एच.डी. आय.एल., पी.एम.सी. बँक घोटाळ्यातील आरोपींशी याच सोमय्यांची व्यापारी भागीदारी आहे. निकॉन इफ्रो कंपनीचे व्यवहार 'ईडी'ने का तपासले नाहीत? पंढरीनाथ साबळे या माहिती अधिकार कार्यकर्त्याने या जमीन घोटाळ्याचे सर्व पुरावे समोर आणूनही 'ईडी'वाले सोमय्यांच्या भ्रष्टाचाराची दखल घ्यायला तयार नाहीत. महाराष्ट्रात नवे सरकार आल्यापासून सर्व घोटाळेबाज मोकाट सुटले आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दूर केलेल्या प्रत्येक अधिकाऱ्यास पुन्हा सेवेत घेऊन सरकारातील भ्रष्टाचाऱ्यांना वाचविणारे नवे सुरक्षा रक्षक जणू निर्माण केले जात आहेत. फोन टॅपिंग प्रकरणात माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना 'ईडी'ने अटक केली. पण अशाच फोन टॅपिंगचा गुन्हा रश्मी शुक्लावरही दाखल आहे, याचा संदर्भ देत संजय पांडे यांना अटक मात्र रश्मी शुक्ला मोकाट असल्यावर सामनातून प्रश्न उपस्थित केला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या खंडणीखोरीचा तर्फज करणारी 'एसआयटी' शिंदे-फडणवीस सरकारने बरखास्त केली. नवनीत राणा यांचे लकडावालाशी असलेले कागदोपत्री आर्थिक व्यवहार 'मनी लॉण्डरिंग प्रकरणातच मोडतात. पण केंद्रीय तपास यंत्रणा या लॉण्ड्री वाल्याना साधे चौकशीलाही बोलवायला तयार नाहीत, असं म्हणत सामनातून नवणीक राणा यांच्यावरही टीका केली.

ज्यांच्यावर खून, बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त करणे, खंडणी, आर्थिक घोटाळे व ईडीच्या चौकशा सुरू होत्या ते सर्व भाजपच्या 'वॉशिंग मशीन मध्ये घुसळून स्वच्छ झाले आहेत. पण यामुळे आझादीचा अमृत महोत्सव मात्र कलंकित आणि गढूळ झाला आहे. महाराष्ट्रात नवे सरकार आल्यापासून भाजपच्या घोटाळेबाजांना एक तर 'क्लीन चिट' मिळत आहे. नाहीतर हायकोर्टातून 'दिलासा' मिळत आहे. सत्य, न्याय व लोक भावनांचा इतका अनादर कधीच झाला नव्हता. राजकीय विरोधकांच्या विरोधात खोटे पुरावे, खोटे गुन्हे निर्माण करायचे, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी तपास यंत्रणांचा दुरुपयोग करायचा, पण स्वताचे सगळे अपराध आणि घोटाळे 'दिलाशा च्या टोपीखाली झाकून ठेवायचे. मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान हेच असेल तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात फाडकणारा तिरंगाही शरमेने खाली झुकेल आणि भंगारात गेलेली विक्रांत युद्धनौका, शेकडो हुतात्मेही तडफडत राहतील. देशाला फसविणारे ठोस पुरावे मागत आहेत! विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात या दिलासा' घोटाळयाचा मुखवटा फाडायलाच हवा विरोधी पक्ष ने करील काय? असा सवाल सामनातून केला आहे.

Updated : 12 Aug 2022 4:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top