Home > Politics > Andheri east bypoll : निवडणूक बिनविरोध करा, राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांना तर प्रताप सरनाईक यांची एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

Andheri east bypoll : निवडणूक बिनविरोध करा, राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांना तर प्रताप सरनाईक यांची एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

Andheri east bypoll Election 2022 : अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूकीने राज्याचे राजकारण तापले आहे. यामध्ये शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या ऋतूजा लटके तर भाजपचे मुरजी पटेल आमने-सामने आहेत. यापार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना तर प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीले आहे.

Andheri east bypoll : निवडणूक बिनविरोध करा, राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांना तर प्रताप सरनाईक यांची एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
X

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पुर्व विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतूजा लटके विरुध्द भाजपचे मुरजी पटेल आमने-सामने आहेत. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना पाठींबा दिला आहे. याबरोबरच राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाकपने ऋतूजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या निवडणूकीत दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यापार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना तर प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे.

राज ठाकरे यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र

राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे की, रमेश लटके यांचा शाखाप्रमुख ते आमदार हा प्रवास मी पाहिला आहे. त्यामुळे रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होणे, ही रमेश लटके यांच्यासाठी श्रध्दांजली ठरेल. त्यामुळे भाजपने ही निवडणूक न लढवता ऋतूजा लटके यांना उमेदवारी द्यावी. तसेच ऋतूजा लटके यांना कसे निवडून आणता येईल ते पहावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

मी माझ्या पक्षातर्फे दिवंगत लोकप्रतिनिधीच्या पत्नी निवडणूक लढवतात, त्यावेळी उमेदवार देत नाही. उमेदवारी न देऊन मी त्या लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच देण्याचा प्रयत्न करतो. तुम्हीही असाच निर्णय घ्यावा, असं माझं मन सांगतं, असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांच्या पत्रापाठोपाठ प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीले आहे.

प्रताप सरनाईक यांचे पत्र

प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ऋतूजा लटके यांना बिनविरोध निवडणूक देण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करावी, असंही या पत्रात म्हटले आहे.

प्रताप सरनाईक यांनी लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे की, आमदार सुनिल राऊत, रमेश लटके आणि मी मतदारसंघातील विविध विषयांवर कायम चर्चा करायचो. तसंच रमेश लटके हे मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत आवाज उठवायचे. मात्र दुबईत त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांना भारतात आणण्यासाठीची प्रक्रीया पुर्ण करण्यासाठी फोन वरून मदत केली. रमेश लटके हे माझे चांगले मित्र होते. त्यामुळे युतीतील अंधेरी पूर्व जागा जरी भाजपला गेली असली तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून ही जागा बिनविरोध करण्याची मागणी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे पत्र आणि शरद पवार यांची पत्रकार परिषद यावर प्रतिक्रीया दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपमध्ये निवडणूकीबाबत निर्णय मी एकटा घेत नाही. आमच्या पक्षाची निवडणूक समिती असते. ती यासंदर्भात निर्णय घेईल. याबाबत आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Updated : 17 Oct 2022 4:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top