Home > Politics > झारखंड सरकार पाडण्याचा कट, महाराष्ट्रातील बड्या नेत्याचे नाव चर्चेत

झारखंड सरकार पाडण्याचा कट, महाराष्ट्रातील बड्या नेत्याचे नाव चर्चेत

झारखंड सरकार पाडण्याचा कट, महाराष्ट्रातील बड्या नेत्याचे नाव चर्चेत
X

झारखंडमध्ये काँग्रेस- जेएमएम आणि राष्ट्रीय जनता दलाचे आघाडी सरकार पाडण्याचा डाव आखण्यात आला होता, असा धक्कादायक खुलासा या प्रकरणी अटक केलेल्या तीन आरोपींनी केला आहे. तसेच यामध्ये भाजपच्या दोन नेत्यांचा सहभाग असल्याची माहिती या आऱोपींनी दिल्याचे धक्कादायक वृत्त दैनिक भास्करने दिले आहे. महाराष्ट्राचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे नेते चरण सिंह आणि उद्योगपती जयकुमार बोलखेडे तसेच मोहीत भारतीय यांनी झारखंडचे सरकारची पाडण्याचा कट आखला होता, असा गंभीर गौप्यस्फोट या वृत्तामध्ये करण्यात आला होता.

या तिघांनी झारखंडमधील ३ आमदारांची दिल्लीमध्ये भाजपच्या काही नेत्यांसोबत बैठकही घडवून आणली होती. तसेच १ कोटी रुपये एडव्हान्स देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, पण एडव्हान्स न मिळाल्याने हे आमदार नाराज होऊन रांचीला परतले होते अशी माहिती या तीन आरोपींनी चौकशी दरम्यान दिली होती, असे या वृत्तामध्ये सांगण्यात आले आहे. काँग्रेसचे दोन आमदार उमाशंकर अकेला, इरफान अन्सारी आणि एक अपक्ष आमदार अमित यादव या तीन आमदारांनी भाजपने ऑफर दिली होती, असा दावा या वृत्तामध्ये करण्यात आला आहे. तसेच मोहीर भारतीय व जय कुमार बालकुंड यांनी यासाठी पैशांची व्यवस्था केली होती, अशीही माहिती या आरोपींनी दिल्याचे या वृत्तामध्ये सांगण्यात आले आहे.

या प्रकरणातील आरेपी अभिषेक दुबे याने यासंदर्भात माहिती दिल्याचे या वृत्तात सांगण्यात आले आहे. दरम्यान काँग्रेसचे आणखी एक आमदार नमन विक्सल कोंगाड़ी यांनी आपल्यालाही मंत्रीपद आणि ५० लाखांची ऑफर देण्यात आली होती, असा आरोप केला आहे. एवढेच नाही तर गेल्या काही दिवसांत आपल्याला वारंवार संपर्क करण्यात येत होता, तसेच सरकार पाडण्यासाठी ऑफर देण्यात येत होती, असाही आरोप त्यांनी केला आहे.

झारखंड सरकार पाडण्याचा कट आखल्याप्रकरणी रांची पोलिसांनी शनिवारी अभिषेक दुबे, अमित सिंह आणि निवारण प्रसाद महतो यांच्याविरुद्ध FIR दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी रांचीमधील एका मोठ्या हॉटेलमधून या तिघांना अटक केली.

भाजपच्या नेत्यांचे म्हणणे काय?

यासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांना दै.भास्करने विचारले तेव्हा, त्यांनी सर्व आऱोप फेटाळले तसेच या प्रकरणात आपले नाव कसे आले याची माहिती नाही. १९ जुलै पासून आपण उ.महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर चरण सिंह यांना संपर्क केला तेव्हा त्यांनीही सर्व आरोप फेटाळले असून आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असे स्पष्ट केले आहे. तर दै. भास्करने उद्योगपती जयकुमार बेलखेडे यांना संपर्क केला, तेव्हा त्यांचा फोन स्वीच ऑफ होता.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तिन्ही आरोपींपैकी दोघांच्या कुटुंबियांनी हे आरोप निर्दोष असल्याचा दावा केला आहे. तसेच निवारण प्रसाद महतो हा फळे आणि भाजीपाला विकतो तर अमित सिंह या मजूर आहे, असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

Updated : 26 July 2021 10:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top