Home > Politics > 'तालिबानने गुलामगिरीची बेडी तोडली' तालिबानच्या विजयावर इम्रान खान यांचे अजब विधान...

'तालिबानने गुलामगिरीची बेडी तोडली' तालिबानच्या विजयावर इम्रान खान यांचे अजब विधान...

तालिबानने गुलामगिरीची बेडी तोडली तालिबानच्या विजयावर इम्रान खान यांचे अजब विधान...
X

Photo courtesy : social media

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अफगाणिस्तानवर तालिबानने मिळवलेल्या विजयाबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. तालिबानचा विजय म्हणजे 'गुलामगिरीच्या बेडीतून मुक्तता' आहे. असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे, रविवारी राजधानी काबूलवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानचा ताबा घेतला. अफगाणिस्तानची सत्ता कट्टरपंथियांच्या हातात गेल्याने आता महिलांना शिक्षण, रोजगार यासह लग्नाचा अधिकार नाकारला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शिक्षणाच्या माध्यमांच्या स्वरूपात इंग्रजी आणि संस्कृतवर होणाऱ्या प्रभावाच्या मुद्द्यावर बोलतांना इम्रान खान म्हणाले, "तुम्ही इतरांची संस्कृती स्वीकारता आणि मानसिकदृष्ट्या त्याच्या अधीन होता. जेव्हा असं घडतं तेव्हा लक्षात ठेवा की ते वास्तविक गुलामगिरीपेक्षा वाईट आहे. सांस्कृतिक गुलामगिरीची साखळी सोडवणे कठीण आहे. मात्र, सध्या अफगाणिस्तानात जे काही घडत आहे, त्याने गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या आहेत."

उल्लेखनीय म्हणजे, युद्धग्रस्त अफगाणिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, तालिबानने रविवारी देशाची राजधानी काबूलवर ताबा मिळवला असून एका प्रकारे, आता संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानचे नियंत्रण प्रस्थापित झाले आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांनी शेजारच्या ताजिकिस्तानमध्ये आश्रय घेतला आहे.

तालिबानच्या सशस्त्र सदस्यांनी राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतल्याचे फोटोही समोर आले आहेत. तालिबानने काबूलवर कब्जा केल्यानंतर भीतीची परिस्थिती निर्माण झाली असून भीतीमुळे लोक देश सोडून जात आहेत.

दरम्यान, एका न्यूज रिपोर्टनुसार, राजधानी काबुलच्या विमानतळावर जमलेल्या हजारो लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याने 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रत्येकाला कोणत्याही परिस्थितीत विमानात प्रवेश करायचा होता. खरं तर, सोमवारी, हजारो लोक देश सोडण्यासाठी विमानतळावर आणि विमानतळाच्या आसपास जमले होते. दरम्यान, सोमवारी सकाळी काबूल विमानतळावर गोंधळ उडाला असता जमावाला पांगवण्यासाठी अमेरिकन सैन्याला हवेत गोळीबार करावा लागला.

दरम्यान, अफगाणिस्तानमधील वेगाने बदलत्या परिस्थितीवर "गंभीर चिंता" व्यक्त करत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी रविवारी तालिबान आणि इतर सर्व पक्षांना "संयम" बाळगण्याचे आवाहन केले आहे. जीवनाचे रक्षण करा आणि मानवी गरजा पूर्ण करता येतील याची खात्री करा. असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनेही म्हटलं आहे.

Updated : 16 Aug 2021 1:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top