Home > Politics > सभापती अ‍ॅड. नितीन लांडगे यांना नाहक गोवण्याचा प्रयत्न!- आमदार महेश लांडगे

सभापती अ‍ॅड. नितीन लांडगे यांना नाहक गोवण्याचा प्रयत्न!- आमदार महेश लांडगे

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती अ‍ॅड. नितीन लांडगे यांना नाहक गोवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा भाजप आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.

सभापती अ‍ॅड. नितीन लांडगे यांना नाहक गोवण्याचा प्रयत्न!- आमदार महेश लांडगे
X

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती यांच्यासह ४ कर्मचाऱ्यांवर पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत अटक केली आहे. यामागे खूप मोठा राजकीय हस्तक्षेप आणि षडयंत्र असून, अ‍ॅड. नितीन लांडगे यांना नाहक गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा दावा पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी केला.ते पिंपरी चिंचवड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

पिंपरी - चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापतींच्या कार्यालयावर बुधवारी (दि.१८) रोजी पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली. रोकड, कागदपत्रे ताब्यात घेत स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नितीन लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे आणि तीन कर्मचाऱ्यांची चौकशी केली. पंचनामा, जाबजबाब घेत सभापती आणि चार कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि प्रवक्ते अमोल थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी महेश लांडगे म्हणाले की, अतिशय खालच्या थराला जाऊन पिंपरी-चिंचवडमध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अँटी करप्शन विभागाने कारवाई कोणत्या आधारावर केली. हे अजून स्पष्ट झालेले नाही. केवळ तक्रार केली म्हणून कारवाई केली हे अपेक्षित नाही. कोणताही लेखी पुरावा नसताना, एखादे कॉल रेकॉर्ड नसताना कोणत्या आधारावर कारवाई केली. अ‍ॅड. नितीन लांडगे अतिशय स्वच्छ आणि समाजसेवेचा वारसा असलेल्या परिवारातील व्यक्तिमत्व आहे ते राजकारणात केवळ आणि केवळ समाजसेवा म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडून अशी कोणतीही गोष्ट होणे शक्य नाही. अ‍ॅड. नितीन लांडगे आणि इतर चार कर्मचाऱ्यांवर झालेल्या कारवाई बाबत भारतीय जनता पक्षाकडून पाठपुरावा केला जाणार आहे यामधून सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत अ‍ॅड. लांडगे यांच्या पाठीशी पक्ष उभा राहणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील सत्य समोर येईल तोपर्यंत पाठपुरावा करा अशा सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप करून षडयंत्र रचून अ‍ॅड. लांडगे यांना गोवण्याचा जो प्रयत्न झाला आहे त्याचा पर्दाफाश भाजपच करणार आहे असे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी नमूद केले.

सत्य समोर येईल; हा रचलेला डाव

दरम्यान माजी शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, अ‍ॅड. नितीन लांडगे स्वच्छ प्रतिमा आणि घरंदाज व्यक्तिमत्व आहे. त्यांची स्वतःची इतकी मालमत्ता आहे. कोणताही लोभ मनात ठेवून ते काहीही करणार नाही.भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहरात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. नागरिकांच्या हिताच्या अनेक चांगल्या गोष्टी भाजपच्या सत्ताकाळात महापालिकेने उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजपाची सत्ता शहरात येणार असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्यामुळे केवळ राजकीय हेतू ठेवून अँटी करप्शनची कारवाई व्हावी या हेतूने संपूर्णपणे हा प्रकार रचण्यात आलेला आहे. मात्र, सत्य समोर आल्याशिवाय राहणार नाही. सत्य समोर यावे म्हणून प्रशासकीय यंत्रणेला भाजपाकडून संपूर्णपणे सहकार्य केले जाणार आहे यातून "दूध का दूध और पानी का पानी" होईल असेही ते म्हणाले.

Updated : 19 Aug 2021 12:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top