Home > Politics > Gujrat Election 2022 : आप करणार भाजपचा टांगा पलटी?

Gujrat Election 2022 : आप करणार भाजपचा टांगा पलटी?

2017 मध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर झाली होती. मात्र 2022 मध्ये समीकरणं बदलली आहेत. नेमकं काय बदललं आहे? याबरोबरच कोणत्या भागात कुणाचं वर्चस्व होतं? जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट नक्की पहा...

Gujrat Election 2022 : आप करणार भाजपचा टांगा पलटी?
X

गुजरातमध्ये गेल्या 25 वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता आहे. मात्र 2017 च्या निवडणूकीत काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिली होती. मात्र आता आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये आपल्या फ्री कार्डसह जोरदार ताकद लावली आहे. त्यामुळे गुजरात तीनही पक्षांसाठी महत्वाचा ठरणारा आहे. पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी आज तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे.

2017 मध्ये कोणत्या भागावर कुणाचं वर्चस्व

2017 च्या विधानसभा निवडणूकीत थेट भाजप विरुध्द काँग्रेस असा सामना झाला होता. यामध्ये काँग्रेस सत्तेपर्यंत पोहचू शकली नसली तर काँग्रेसने जोरदार टक्कर दिली होती. त्यावेळी काँग्रेसने 182 जागांपैकी 77 जागांवर, भाजपने 99 जागांवर तर सहा अपक्ष जिंकले होते. मात्र कायम एकहाती वर्चस्व राखलेल्या भाजपसाठी 2017 ची निवडणूक जड गेली होती. मात्र पाच वर्षानंतर 2022 च्या निवडणूकीत आम आदमी पक्ष हा नवा फॅक्टर आला आहे. त्यामुळे गुजरातमध्ये तिहेरी लढत होणार आहे.

गुजरातमधील एकूण 180 जागांपैकी मध्य गुजरातमध्ये 61, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये 54, उत्तर गुजरातमध्ये 32 आणि दक्षिण गुजरातमध्ये 35 जागांचा समावेश आहे.

मध्य गुजरात कुणाचं?

2017 च्या निवडणूकीत मध्य गुजरातमध्ये 61 जागांपैकी काँग्रेसने 22 तर भाजपने 37 जागांवर विजय मिळवला होता. त्याबरोबरच इतरांना दोन जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे मध्य गुजरातवर भाजपचं वर्चस्व असल्याचं दिसून येत आहे.

सौराष्ट्र-कच्छ कुणाचं?

सौराष्ट्र आणि कच्छच्या भागात 54 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 2017 मध्ये काँग्रेसने 30 जागांवर विजय मिळवला होता. मात्र भाजपला अवघ्या 23 जागांवर विजय मिळाला होता. त्यावेळी एक जागा इतरांना मिळाली होती. त्यामुळे सौराष्ट्र आणि कच्छवर काँग्रेसचं मोठं वर्चस्व असल्याचं दिसून येत आहे.

दक्षिण गुजरातमध्ये काय स्थिती आहे?

दक्षिण गुजरातमध्ये भाजपने 35 जागांपैकी 25 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेस आठ आणि इतरांना दोन जागा मिळाल्या होत्या. या भागात भाजपचं निर्विवाद वर्चस्व असल्याचं स्पष्ट होत आहे.

उत्तर गुजरात कुणाचं?

उत्तर गुजरातमध्ये काँग्रेस नेते जिग्नेश मेवानी यांचा मतदारसंघ येतो. 2017 मध्ये या भागात 32 जागांपैकी 14 जागांवर भाजप तर 17 जागांवर काँग्रेस उमेदवार विजयी झाले होते. एवढंच नाही तर काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवारी भरलेले जिग्नेश मेवानी यांचाही विजय झाला होता. त्यामुळे या भागात काँग्रेसचं वर्चस्व आहे.

आप करणार भाजपचा टांगा पलटी

2017 मध्ये गुजरातमध्ये दुहेरी लढत झाली असली तर सध्या आम आदमी पक्षाने जोर लावला आहे. त्यामुळे आम आदमी पक्ष थेट सत्तेत जाण्याचा दावा करत आहे. मात्र ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जतीन देसाई म्हणाले की, गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने जोर लावला असला तरी भाजपने आपलं केडर मजबूत केलं आहे. त्याबरोबरच अखेरच्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या सभा गुजरातमध्ये झाल्या आहेत. त्यामुळे भाजप पुन्हा सत्तेत येण्याची चिन्हं आहेत. दुसरीकडे भारत जोडो यात्रेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत असला तरी त्याचा थेट गुजरात निवडणूकीवर परिणाम होणार नाही. गुजरात निवडणूकीत भाजप आणि आम आदमी पक्षाने सुरुवातीपासून प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र काँग्रेस नेते अखेरच्या टप्प्यात प्रचारात उतरले. काँग्रेसने 2017 प्रमाणे ही निवडणूक गंभीर घेतली असती तर भाजपला टक्कर देण्यात यश मिळाले असते. दुसरीकडे आम आदमी पक्ष हिंदूत्वाचा मुद्दा रेटत असला तरी त्याचा फटका भाजपला बसणार की काँग्रेसला हे 8 डिसेंबर रोजी निकालानंतरच समजणार आहे.

Updated : 2022-12-02T14:17:42+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top