Home > Health > महाराष्ट्राचे रांगडे मल्ल डोपिंगच्या विळख्यात

महाराष्ट्राचे रांगडे मल्ल डोपिंगच्या विळख्यात

महाराष्ट्राच्या रांगड्या कुस्तीचा खेळ खंडोबा झालाय का? पैलवानांना प्रोटीन, गोळ्या, इंजेक्शनचे व्यसन लागलंय का? महाराष्ट्राच्या तांबड्या मातीत 'डोपिंगचं' विष कोण कालवतय? देखणा, तगडा दिसणारा रांगडा पैलवान आतून उद्धवस्त होतोय का? वाचा कुस्तीगीर राहिलेले आणि सध्या पत्रकारिता करत असलेले पै.मतीन शेख यांचा लेख...

महाराष्ट्राचे रांगडे मल्ल डोपिंगच्या विळख्यात
X

अलीकडच्या दशकात कुस्तीला थोडं ग्लॅमर आलं. कुस्तीला चांगले दिवस आले असं वाटू लागलं. बक्षीसांच्या रकमा वाढल्या. पैलवानांकडे पैसा आला. बक्षीसाच्या रुपाने गाड्या घोड्या आल्या. प्रत्येक जण कुठला तरी केसरी झाला. पैलवान छोट्या मोठ्या गदेचा मानकरी ठरला. पैलवानांच राहणीमान सुधारलं. खुराकाची चांगली सोय झाली.

राजकीय मंडळींनी कुस्तीचा इंव्हेट केला. पैलवान म्हणतील तो इनाम ठरु लागला. कुस्ती जोडायला, मध्यंस्थीला दलाल आले. दलालांना विशिष्ट हिस्सा मिळू लागला. ग्लॅमर आणि पैशांची चटक वाढत गेली. कष्ट, तांबड्या मातीशी इमान कमी झालं. सर्व काही प्रोटीन पावडर, इंजेक्शन, गोळ्यावर अवलंबून राहू लागलं.

सिक्स पॅकवाली, मसल्सवाली आकर्षक, देखणी पण आतून पोकळ, खोटी बॉडी सर्वांचीच दिसू लागली. नुरा कुस्ती वाढायला लागली. आपल्या पोरांची तब्येत भारी दिसतेय म्हणून बाप खुश व्हायला लागला. चांगल्या तगड्या पोरांची फळी आपल्याच तालमीत आहे म्हणून वस्तादांनी खोटा खोटा अभिमान बाळगणं सुरु केलं. आणि आपल्या महाराष्ट्राच्या रांगड्या कुस्तीचा खेळ खंडोबा व्हायला सुरुवात झाली.

काळ तसा जुना नाही, एक आठ दहा वर्षा पुर्वीचाच. आम्ही मैदानी कुस्ती लढत होतो. इनामाच्या रकामा कमी असायच्या. मैदानातच समोरासमोर कुस्ती जोडली जायची. एकमेकांनी समोरासमोर आव्हान स्विकारायचं ही रोमांचक गोष्ट होती, जी आज या पोस्टर वरली ठरवलेल्या कुस्ती प्रथेने बंद केली. मुळ इनामात हजार पाचशे रुपयांची वाढ करावी म्हणुन आम्ही पंचांच्या हाताला धरुन विणवणी करायचो. त्यांच्या मागे मागे करायचो. का तर कुस्ती जोडली जावी. चार पैसे कमी का असेना पण कुस्ती न लढता रिकाम्या हाताने माघारी जावू लागु नये म्हणून. शेवटी पंचाच्या मर्जीने ठरलेल्या इनामावर इर्षेने कुस्ती व्हायची. हार झाली तर काही स्पर्धेत वीस टक्के तर कुठे काहीच इनाम मिळत नसत. त्यामुळे जिंकणं हेच अंतिम असायचं.

आता काळ बदलला. पैलवान म्हणतील ती एक्कम, पैलवान सांगतील त्याच्या बरोबरच कुस्ती जोडली जावू लागली. हरला तरी त्यांने ठरवलेली रक्कम द्यायची. जिंकणाऱ्याला ही त्याच्या म्हणण्या प्रमाणे इनाम. इथच इर्षा संपली. पैशाची सधनता आली अन् अधिकाअधिक डोपिंग वाढू लागलं. दोन हजाराच्या जोडीला पोरगा पण इंजेक्शन घेवू लागला. मल्लांचा हजार रुपया पासून ते लाखांच्या घरात डोपिंग खर्च होवू लागला.

इंजेक्शनने खुपच पॉवर येतेय, कसलाच दम लागत नाही. हा गैरसमज वाढत गेला. स्पर्धेपुरतं होणारं डोपिंग रोज तालमीत होवू लागलं. गोळी खाल्याशिवाय, ढुंगणात सुई टोचवून घेतल्याशिवाय रोजचा सराव पण पुर्ण होईना. सवय झाली याची. व्यसनच लागलं या डोपिंचं. नशाच ही एक प्रकारची. पुढे आणखी विविध प्रकारच्या नशा होवू लागल्या. वरुन देखणा, तगडा दिसणारा रांगडा पैलवान गडी आतून उद्धवस्त होतोय....

Updated : 4 July 2024 7:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top