Home > Culture > जव्हारमधील सोनू म्हसे यांची घांगळ वाजत आहे जी-20 परिषदेत

जव्हारमधील सोनू म्हसे यांची घांगळ वाजत आहे जी-20 परिषदेत

दिल्लीत जी-20 परिषद सुरु आहे. या परिषदेत जागतिक नेत्यांच्या स्वागतासाठी काही वादकांसा समूह सज्ज होता. त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील सोनू म्हसे यांची घांगळ वाजणार आहे.

जव्हारमधील सोनू म्हसे यांची घांगळ वाजत आहे जी-20 परिषदेत
X

जी २० शिखर परिषदेत जागतिक नेत्यांच्या संगीतमय स्वागतासाठी काही वादकांचा समूह सज्ज झालाय. त्यात जव्हार तालुक्यातील साकुर पैकी कडाची मेट येथील सोनू म्हसे यांना सहभागी होण्याचा मान हा त्यांच्या अंगी असलेल्या पारंपारिक घांगळी वादन या कलेमुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. या समारंभात देश भरातील वादक सहभागी झाले असून त्यात, ३४ हिंदुस्थानी वाद्ये, १८ कर्नाटकी वाद्ये आणि २६ लोकवाद्ये यांचा समावेश आहे. ७८ कलाकारांमध्ये ११ मुले, १३ महिला, ६ दिव्यांग कलाकार, २६ तरुण पुरुष आणि २२ व्यावसायिकांचा समावेश झाला असल्याची माहिती म्हसे यांच्या कुटुंबीयांनी दिली.

आदिवासीच्या रुढी, परंपरा, संस्कृती व चालीरीती जोपासण्यासाठी घांगळी वाद्य वाजवण्याची व त्यावर कणसरीची कथा गायन करण्याची विद्या त्यांना लहानपणी आजोबांकडून प्राप्त झाली आहे. वयाच्या १६ व्या वर्षापासून घांगळी ,वादन आदिवासी कला अवगत करून त्याची जोपासना त्यांनी केलीय. शिवाय आपल्या या कलेच्या माध्यमातून आदिवासींची संस्कृती आणि निसर्गाची जोपासना करून ही अस्मिता कायम टिकून राहावी असा त्यांचा प्रयत्न आहे.

उत्सवाची मांडणी व पूजा तसंच घांगळी वाद्यावर गायन करुन दोन दिवसात कणसरी देवीच्या उत्सवाची सांगता करतात. हा उत्सव मार्गशिर्ष महिन्यात शेतकऱ्यांच्या घरी व खळ्यावर नागली मळून करतात. जवळपास दोनशे उत्सव पार पाडले आहेत. तसंच चाल लावून सरावर मृत्यूची कथा रात्रभर सांगून पारंपरिक उत्तर कार्याचा कार्यक्रमही ते पार पाडतात.

घांगळी हे वारली समाजाचं पारंपरिक वाद्य आहे. हे वाद्य काहीसं विणासारखा दिसतं. वारली समाजात दिवाळी, शिमगा यांसारखे सण, लग्नसमारंभ तसंच प्रार्थना करताना हे वाद्य वापरलं जातं. त्यावेळी हे घांगळी वाद्य प्रामुख्याने वाजविलं जातं. हे वाद्य वाजविणाऱ्यांना घांगळी भगत असं म्हटलं जातं. आपल्याला हे वाद्य भू-मातेनं दिलंय, अशी वारली लोकांची श्रध्दा आहे. घांगळी वाद्य बनविण्यासाठी दोन सुकलेल्या भोपळ्यांचा वापर केला जातो. दोन्ही भोपळ्यांना जोडण्यासाठी उत्तम प्रतीच्या बांबूंचा उपयोग करतात. मेणानं ते जोडलं जातं. त्यातून नाद निर्माण करण्यासाठी या बांबूवर तारा बसविलेल्या असतात. हे वाद्य वाजविण्यासाठी मोरपिसं, काचेच्या रंगीत बांगड्या, आरसा किंवा बोटांचा वापर केला जातो. हा तंतुवाद्याचा आद्य प्रकार आहे.

Updated : 10 Sep 2023 3:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top