Home > Culture > होलिकेला नमन करुन व्यसनांच्या राक्षसाचे दहन...

होलिकेला नमन करुन व्यसनांच्या राक्षसाचे दहन...

महाराष्ट्रात व्यसनमुक्तीचे वारे वाहत असताना होळी काही दिवसांवर आली असतानाचं महाराष्ट्र समाज कल्याण विभाग आणि सामाजिक न्याय विभागाच्यावतीने एक अनोखा उपक्रम मुंबईत राबवण्यात आला.

होलिकेला नमन करुन व्यसनांच्या राक्षसाचे दहन...
X

उत्सव आला की व्यसन आले. आज उत्सव वाचवणे गरजेचे आहे म्हणून अनोखा उपक्रम करुन होलिकेला नमन करुन व्यसनांचे दहन होळी रुपाने करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन आज कँपिटल सिनेमा समोर मुंबई येथे करण्यात आले होते. मा. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, मुंबई शहर श्री. प्रसाद खैरनार यांनी व्यसनमुक्तीसाठी उचलेले हे पाऊल स्वागतार्ह असल्याचे म्हटले. कारण व्यसनांना अटकाव करायचा असेल तर सुरुवात तंबाखू पासून करावी लागेल. यावेळी दारु, गुटखा, सिगारेट, अमली पदार्थ, गांजा, अफू, गर्द, ड्रग्ज, चरस यांची वेष्टणे, आवरणे या व्यसनांचा आठ फुटी भव्य राक्षसाचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. जेणेकरुन समाजातील व्यसनांचा समूळ नाश होईल व निर्व्यसनी मुंबई व महाराष्ट्राचे स्वप्न पुर्ण होईल.

कार्यक्रमाची सुरुवात अपुनको नको लिमिट - L लिकर, T टोबॅको, D ड्रग्ज या व्यसनमुक्तीवरील धमाकेदार सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. शाहीर नंदू बनसोडे यांनी गीते, भारुड सादर केली. ठुमकेदार भारुडाने उपस्थित जनसमुदायांत प्रबोधन घडवून आणले. आपण करित असलेल्या व्यसनामुळे जखडलेल्या राक्षसाने आपल्या मुसक्या आवळल्याचे चित्रण यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातुन दाखविण्यात आले.


व्यसनांच्या या राक्षसाभोवती व्यसनांचे दुष्परिणाम दर्शविणारी पोस्टर्स प्रदर्शनी लोकांचे लक्ष वेधुन घेत होती. व त्यातुन व्यसनांचा आयुष्यावर किती घातक परिणाम होतो व त्यापासुन परावृत्त राहुन आनंदी जीवन जगण्याचा अनमोल सल्ला उपस्थितांना मिळाला. वाचा विचार करा आणि निर्व्यसनी महाराष्ट्र निर्माण करण्याच्या संकल्पात सहभागी व्हा या पत्रकांचे वाटप यावेळी करण्यात आले.

नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी मार्गदर्शन करताना व्यसन हा मानसिक, शारिरीक व कौटुंबिक आजार आहे व तो दूर होऊ शकतो. एखाद्या माणसाला व्यसन कोणते आहे व ते किती आहे यावर त्याचे उपचार अवलंबून असतात. आपणही उपचार करून बरे होऊ शकता त्यामुळे स्वतः व इतरांना निर्व्यसनी करण्यासाठी नशाबंदी मंडळात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले व उपस्थित जनसमुदायाला निर्व्यसनी राहण्याचा संकल्प दिला. मुंबई येथे झालेल्या या होळीच्या अनोख्या कार्यक्रमास स्थानिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

तसेच याच प्रकारच्या होळीच्या कार्यक्रमाचे आयोजन संपुर्ण महाराष्ट्रात करण्यात आले असून नुसतेच वरील व्यसने नव्हे तर सध्याच्या दैनंदिन जिवनात असणारी सोशल मिडियातील फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम यासारख्या व्यसनांना पुढील काळात गंभीरतेने सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे अशा व्यसनांचे ही दहन करावे असे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.

व्यसनांच्या राक्षसाचे प्रतिकात्मक दहन मंडळाच्या सरचिटणीस, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक श्री. राजन संखे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रोग्राम ऑफिसर श्री. सुनिल दहिवलकर, विद्यार्थी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित जनता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाजातील व्यसनांना बदनाम करण्यासाठी उपस्थितांनी व्यसनांच्या विरोधात घोषणा व बोंबा मारल्या,अशी माहिती मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी दिली.

Updated : 4 March 2023 2:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top