Home > Business > ULI मुळे गरीब आणखी कर्जबाजारी होणार ?

ULI मुळे गरीब आणखी कर्जबाजारी होणार ?

ULI मुळे गरीब आणखी कर्जबाजारी होणार ?
X

देशातील कोट्यावधी नागरिकांच्या गरिबीची मुळे ‘राजकीय अर्थव्यवस्थेत’ आहेत. त्याला हात घालायचा नाही. नाही रिटेल, सूक्ष्म कर्जाचा महापूर आणायचा…. वित्त भांडवलाच्या युगात आपले स्वागत !

नागरिकांना वेगाने रिटेल कर्जे पाजण्यासाठी अजून एक महाकाय पंप : युनिफाईड लेंडिंग इंटरफेस अर्थात यू एल आय (ULI) !

युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) हा शब्द / संकल्पना आता अगदी सामान्य नागरिकांच्या परिचयाची झाली आहे. त्याच धर्तीवर नवीन प्लॅटफॉर्म युनिफाईड लेंडिंग इंटरफेस अर्थात यू एल आय (ULI) असणार आहे.

गरीब / निम्न मध्यमवर्गीय, असंघटित क्षेत्रातील काम करणारे, स्वयंरोजगारी यांच्या दृष्टिकोनातून यू एल आय कडे कसे बघता येईल ?

भारताच्या युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) यश नेत्र दीपक आहे. विकसनशील राष्ट्रातच नाही तर विकसित राष्ट्रांच्या तुलनेत देखील. दररोज छोट्या छोट्या रकमांचे काही हजार कोटी व्यवहार होतात आणि तो आकडा सतत वाढतच आहे. कोणताही निकष लावला तरी हे यश अभिमानास्पदच आहे. त्याच लॉजिकवर आधारित प्लॅटफॉर्म छोटी कर्ज वितरित करण्यासाठी युनिफाईड लेंडिंग इंटरफेस (ULI) रिझर्व बँकेने कार्यन्वित केला आहे.

ज्यावेळी एखादा नागरिक रिटेल कर्जासाठी अर्ज करतो त्यावेळी, बँका / एनबीएफसी यु एल आय प्लॅटफॉर्म वापरू लागल्या आहेत. कर्जदाराबद्दल जी काही माहिती लागते ती डिजिटल किंवा ऑनलाइन पद्धतीने सिस्टीम मधून घेण्यात येते. कमीत कमी वेळात कर्ज मंजूर करून कर्जदाराला कर्ज वितरित करण्याचे प्रयोजन आहे.

युएलआय हा प्लॅटफॉर्म अजूनही तरी बाल्यावस्थेत आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी आणि जमिनीशी निगडित उत्पादन, छोटे व्यावसायिक, स्वयंरोजगारी करणारे, दूध उत्पादक अशा कोट्यावधी नागरिकांची छोट्या कर्जाची भूक मोठी आहे. कर्ज घेताना पेपरवर्क आणि औपचारिकांची परिपूर्ती करायला न लागणे हे नक्कीच त्यांच्या हिताचे असेल याबद्दल शंका नाही. पण ….

दोन मुद्दे आहेत

युएलआय प्लॅटफॉर्म त्याच कर्जदारांसाठी उपयोगी असणार आहे, ज्याचा सर्व प्रकारचा डेटा डिजिटल स्वरूपात सार्वजनिक रित्या उपलब्ध आहे. असंघटित क्षेत्रातील, बॉटम ऑफ पिरॅमिड मधील कोट्यवधी नागरिकांचा तसा डेटा आजतरी तयार नाही हे नक्की

दुसरा मुद्दा आहे जोखीम मूल्यांनकांचा

पेमेंट केल्यावर व्यवहार करणाऱ्या दोन पार्टीजमधील संबंध क्षणार्धात संपुष्टात येतात. पेमेंट करणाऱ्याच्या अकाउंटमध्ये पुरेसे पैसे नसतील तर पेमेंट पुढे जात नाही आणि खरेदीदाराला कॅश देणे भाग पडते. यात जवळपास शून्य जोखीम आहे. कर्ज देणारी संस्था ज्यावेळी कर्जाची रक्कम कर्ज घेणाऱ्याच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणार त्यावेळी कर्ज देणाऱ्या व कर्ज घेणाऱ्यामध्ये कर्ज फिटेपर्यंतच्या काळाचे संबंध तयार होतात. यात जोखीम आहे.

अशा अपरिपक्व अवस्थेत यात धोके आहेत. एन बी एफ सी, फिनटेक, डिजिटल लेंडिंग कंपन्या दारू पिऊन धंदा वाढवण्याच्या उत्साहात आहेत. कसेही करून धंदा वाढवण्यासाठी ULI च्या प्लॅटफॉर्मवरून ते कर्जदार बद्दलच्या अत्यावश्यक माहितीकडे कानाडोळा करण्याची जास्त शक्यता आहे. दुसऱ्या शब्दात युनिफाईड लेंडिंग इंटरफेस सध्यातरी कोट्यवधी गरीब / निम्न मध्यमवर्गीयांचा मित्र बनण्याची शक्यता नाहीच पण कर्जसंस्थांच्या धंदा वाढवण्याच्या उत्साहामुळे गरिबांचा कर्जबाजारीपणा वाढण्याच्या वेगाला यु एल आय मदतकारक ठरू शकते.

आज सर्वात जास्त गरज आहे गरीब कर्जदारांची कर्ज पचवण्याची क्षमता वाढवण्याची, त्या कर्जातून उत्पादक मत्ता तयार करण्याची, गरिबांचे हॅण्ड होल्डिंग करण्याची. त्याबाबत रिझर्व बँक काहीही करत नाही. जास्तीत जास्त कर्जे पाजण्याचा वित्त भांडवलाच्या अजेंड्याला मात्र पूरक भूमिका करत असते.

Updated : 4 Nov 2025 9:07 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top