क्विक कॉमर्स'चा फुगा फुटणार ? ब्लिंकिटच्या सीईओंचा धोक्याचा इशारा
Will the 'quick commerce' bubble burst? Blinkit CEO warns of danger
X
भारतातील महानगरांमध्ये सध्या 'क्विक कॉमर्स'चे (Quick Commerce) वारे वाहत आहे. १० मिनिटांत किराणा माल घरपोच मिळण्याची सोय ग्राहकांसाठी जितकी सुखावह आहे, तितकीच ती कंपन्यांसाठी आर्थिकदृष्ट्या डोकेदुखी ठरत आहे. 'ब्लिंकिट'चे (Blinkit) सीईओ अलिबिंदर धिंडसा यांनी नुकतेच एक धक्कादायक विधान केले आहे. त्यांच्या मते, या क्षेत्रातील 'कॅश बर्न' (पैसा जाळणे) करण्याची क्षमता आता संपत आली असून, लवकरच या उद्योगात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.स्पर्धक कंपन्यांकडे भांडवलाचा तुटवडा निर्माण होत असताना, फक्त ज्यांचे 'युनिट इकॉनॉमिक्स' मजबूत आहे, त्याच कंपन्या टिकतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
नेमके काय म्हणाले ब्लिंकिटचे सीईओ ?
अलिबिंदर धिंडसा यांनी स्पष्ट केले की, हे बिझनेस मॉडेल आतापर्यंत केवळ 'सतत निधी उभारणी' (Relentless Fundraising) या एकाच गोष्टीवर अवलंबून होते. तोटा भरून काढण्यासाठी गुंतवणूकदारांकडून सतत पैसे घेणे, ही पद्धत आता मर्यादेपलीकडे गेली आहे.
सॉफ्टबँक (SoftBank) आणि टेमासेक (Temasek) यांसारख्या बड्या जागतिक गुंतवणूकदारांनी या क्षेत्रात अब्जावधी डॉलर्स ओतले आहेत. अमेरिका आणि युरोपमध्ये असे प्रयोग अयशस्वी ठरले आहेत. मात्र, भारताची परिस्थिती थोडी वेगळी आहे:
दाट लोकवस्तीची शहरे, स्वस्त मजूर आणि UPI मुळे डिजिटल पेमेंटचा प्रसार झाल्यामुळे भारतात 'क्विक कॉमर्स' यशस्वी ठरते आहे.
असे असले तरी, हे गणित शेवटी 'लॉजिस्टिक्सची कार्यक्षमता' आणि 'भांडवलाची उपलब्धता' यावरच अवलंबून आहे.
एकीकडे ब्लिंकिट धोक्याची घंटा वाजवत असताना, दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी निधी उभारण्यासाठी धडपडत आहेत:
ब्लिंकिटची प्रतिस्पर्धी असलेल्या स्विगीने नुकताच १.३ अब्ज डॉलर्सचा आयपीओ आणला होता. आता अवघ्या एका वर्षानंतर ते पुन्हा १.१ अब्ज डॉलर्सच्या शेअर विक्रीची तयारी करत आहेत, आणि विशेष म्हणजे त्यांच्या शेअरची किंमत अजूनही आयपीओच्या किमतीच्या आसपासच रेंगाळत आहे.झेप्टोनेही पुढील वर्षी आयपीओ आणण्यापूर्वी ४५० दशलक्ष डॉलर्सचा निधी जमा केला आहे.






