शेअर बाजारातील पडझडीचे 'जपान कनेक्शन'
The 'Japan connection' of the stock market crash
XThe 'Japan connection' of the stock market crash
गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात (Indian Share Market) परदेशी गुंतवणूकदारांनी (FIIs) विक्रीचा सपाटा लावला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जी पडझड पाहायला मिळत आहे, त्याचे मूळ कारण मुंबईत नसून थेट टोकियो (जपान) मध्ये आहे. जपानच्या सरकारी रोख्यांचे (Government Bonds) व्याजदर (Yields) अचानक वाढले आहेत आणि त्याचा थेट फटका भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना (Emerging Markets) बसत आहे.
नेमके काय घडले आहे ?
जपानच्या १० वर्षांच्या सरकारी बॉण्डचे व्याजदर (Yields) नुकतेच १.८% ते ३.४% (कालावधीनुसार) या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. हे गेल्या दशकभरातील सर्वोच्च दर आहेत.
'बँक ऑफ जपान'ने (BoJ) आपली वर्षानुवर्षे चालत आलेली 'निगेटिव्ह इंट्रेस्ट रेट' (Negative Interest Rate) पॉलिसी गुंडाळायला सुरुवात केली आहे. तसेच, जपान सरकारने नुकतेच २१.३ ट्रिलियन येनचे मोठे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे, ज्यामुळे बाजारात कर्जाचा पुरवठा वाढणार आहे. परिणामी, व्याजदर वाढत आहेत.
'येन कॅरी ट्रेड'चे अनवाइंडिंग म्हणजे काय ?
हे समजून घेण्यासाठी आपल्याला 'येन कॅरी ट्रेड' (Yen Carry Trade) ही संकल्पना समजून घ्यावी लागेल.
जपानमध्ये व्याजदर शून्य किंवा निगेटिव्ह असल्याने, जागतिक गुंतवणूकदार जपानमधून 'येन' (Yen) चलनात प्रचंड कर्ज घेतात. हे कर्ज घेतलेले पैसे ते भारतासारख्या देशात गुंतवतात, जिथे व्याजदर आणि शेअर बाजारातील परतावा जास्त आहे. व्याजातील तफावतीमुळे (Interest Rate Differential) गुंतवणूकदार बक्कळ नफा कमावतात.
पण आता काय बिघडले ?
जपानने व्याजदर वाढवल्यामुळे, हे 'स्वस्त कर्ज' आता महाग झाले आहे. ज्या गुंतवणूकदारांनी भारतात पैसे गुंतवले होते, त्यांना आता भीती वाटत आहे की जपानी 'येन' मजबूत झाल्यास त्यांना कर्ज फेडताना जास्त पैसे मोजावे लागतील. त्यामुळे हे गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातील आपले शेअर्स विकून (Selling spree), पैसे पुन्हा जपानला नेऊन आपले कर्ज फेडत आहेत. यालाच 'Unwinding of Carry Trade' म्हणतात.
भारतावर दुहेरी संकट
परदेशी गुंतवणूकदारांनी (FIIs) डिसेंबर महिन्यात आतापर्यंत ६,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त समभागांची विक्री केली आहे. जेव्हा जेव्हा जपानचे बाँड यील्ड वाढतात, तेव्हा तेव्हा परदेशी पैसा भारतातून बाहेर जातो, हा इतिहास आहे.
एकीकडे परदेशी गुंतवणूकदार डॉलर बाहेर नेत आहेत, आणि दुसरीकडे 'येन' मजबूत होत आहे. याचा परिणाम भारतीय रुपयावर होत असून, रुपया डॉलरच्या तुलनेत ९०.१५ च्या नीचांकी पातळीवर गेला आहे. रुपया कमकुवत झाल्याने आपली आयात (विशेषतः तेल) महाग होईल, ज्यामुळे महागाई वाढू शकते.






