रुपयाची 'नव्वदी' ! डॉलरच्या रेकॉर्डब्रेक मुसंडीमागचं नेमकं सत्य काय ?
Rupee's 'Ninety'! What is the real truth behind the dollar's record-breaking decline?
X
सध्या आर्थिक वर्तुळात आणि सामान्य जनतेमध्ये एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे रुपयाची घसरण आणि डॉलरची मुसंडी. काही दिवसांत भारतीय रुपयाचे मूल्य अमेरिकन डॉलरच्या तुलनेत कमी होऊन, डॉलरने आता ९० रुपयांचा टप्पा गाठून तिथे स्थिरावल्याचे चित्र दिसत आहे.
पण हे नेमके का घडते ? रुपयाची किंमत का कमी झाली ? आज आपण यामागचे अर्थशास्त्र सोप्या भाषेत समजून घेऊया.
कोणत्याही देशाच्या चलनाचे मूल्य हे प्रामुख्याने खालील पाच महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून असते
१. दोन देशांमधील महागाई दरातील तफावत (Inflation Difference)
२. व्याजदर (Interest Rates)
३. राजकीय व आर्थिक स्थैर्य
४. राजकोषीय तूट (Fiscal Deficit)
५. सरकारी कर्जाचे प्रमाण
यातील सध्याच्या परिस्थितीला कारणीभूत ठरणारे मुख्य घटक आपण पाहूया.
१. महागाईचा परिणाम (Inflation Impact) : सध्या आपल्या देशातील महागाईचा दर हा साधारणतः ४% च्या घरात आहे, तर अमेरिकेतील महागाईचा दर हा १% इतका कमी आहे. अर्थशास्त्राचा नियम असा सांगतो की, ज्या देशात महागाईचा दर जास्त असतो, त्या देशाच्या चलनाचे मूल्य कालांतराने कमी होते. उदाहरणार्थ: जी वस्तू पूर्वी २० रुपयांना मिळायची, ती महागाईमुळे २५ रुपयांना झाली, तर याचा अर्थ तुमच्या पैशाची खरेदी क्षमता (Purchasing Power) कमी झाली. महागाई जेवढी वाढेल, तेवढे रुपयाचे मूल्य कमी होत जाते.
२. व्याजदरांचे गणित (Interest Rate War) : दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे व्याजदर.भारतातील व्याजदर मागील दोन वर्षांत ६.६०% वरून ५.२०% इतका खाली आला आहे.याच्या अगदी उलट, अमेरिकेने महागाई रोखण्यासाठी त्यांचे व्याजदर ०.२५% वरून वाढवून ४.२५% पर्यंत नेले आहेत.याचा परिणाम काय झाला? परकीय गुंतवणूकदारांना (FIIs) आता अमेरिकेत गुंतवणूक करणे जास्त फायदेशीर आणि सुरक्षित वाटू लागले आहे. जेव्हा ते भारतात गुंतवणूक करतात, तेव्हा त्यांना 'गुंतवणुकीवरील परतावा' आणि 'रुपयाची घसरण' (Currency Risk) अशा दोन जोखमी सांभाळाव्या लागतात. जर रुपया घसरला, तर त्यांचा होणारा नफा त्यामध्येच निघून जातो. त्यामुळे सुरक्षित परताव्यासाठी त्यांनी आपला मोर्चा अमेरिकेकडे वळवला आहे.
३. अमेरिकन शेअर बाजार आणि 'मॅग्निफिसेंट ७' (Magnificent 7) : मागील वर्षात अमेरिकन शेअर बाजारातील 'मॅग्निफिसेंट ७' (अॅपल, मायक्रोसॉफ्ट, गुगल इ. सारख्या ७ बड्या कंपन्या) शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली. त्या तुलनेत भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांना तितक्या मोठ्या संधी (Opportunities) उपलब्ध झाल्या नाहीत. परिणामी, परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसे काढून अमेरिकेत गुंतवणे पसंत केले.
रुपया का पडला ?
मागणी आणि पुरवठा) जेव्हा परकीय गुंतवणूकदार भारतातून पैसा काढून घेतात, तेव्हा ते आपले शेअर्स विकतात, म्हणजेच ते 'रुपया विकतात' आणि त्याबदल्यात 'डॉलर खरेदी करतात'. यामुळे बाजारात डॉलरची मागणी (Demand) प्रचंड वाढली आणि रुपयाचा पुरवठा वाढला. मागणी आणि पुरवठ्याच्या मूलभूत नियमानुसार—ज्याची मागणी जास्त, त्याचा भाव जास्त! म्हणूनच डॉलर वधारला आणि रुपया घसरला.
डॉलर ९० रुपयांवर गेला असला, तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. आजची परिस्थिती १९९१ च्या आर्थिक संकटासारखी मुळीच नाही. आज भारताची अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत स्थितीत आहे. आपल्याकडे ६८६ अब्ज डॉलर्स (USD 686 Billion) इतका प्रचंड परकीय चलन साठा (Forex Reserve) उपलब्ध आहे. या साठ्याच्या जोरावर आपण पुढील १३ महिने पुरेल इतकी आयात सहज करू शकतो. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती स्थिर आहे.
शेवटी, रुपयाला बळकट करण्यासाठी आपण काय करू शकतो? राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी दिलेला 'स्वदेशी'चा नारा आजही तेवढाच महत्त्वाचा आहे. आपण आपल्या वैयक्तिक जीवनात जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे देशाचा पैसा देशातच राहील आणि रुपयाला बळ मिळेल.
(लेखक हे एका बहुराष्ट्रीय बँकेत सहाय्यक उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत)






