Rupee vs Dollar : रुपयाची ३ वर्षांतील सर्वात मोठी घसरण
दर ९०.८३ च्या ऐतिहासिक नीचांकावर
X
भारतीय रुपयाची 'फ्री फॉल' अर्थात अवमूल्यन सुरूच असून, चलनाने पुन्हा एकदा निच्चांक गाठला आहे. सुरुवातीच्या व्यापारात रुपयाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ५ पैशांची घसरण नोंदवत ९०.८३ ही आतापर्यंतची सर्वात नीचांकी पातळी (Lifetime Low) गाठली आहे.
सोमवारी रुपया ९०.७८ वर बंद झाला होता, मात्र मंगळवारी ही घसरण अधिक गडद झाली आहे. या वर्षात आशियाई चलनांमध्ये भारतीय रुपयाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. वर्षभरात रुपयाने ६ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली असून, ही गेल्या तीन वर्षांतील एका वर्षात झालेली सर्वात मोठी घसरण आहे.
रुपया आज का कोसळला ?
१. भारत-अमेरिका व्यापार करारातील अनिश्चितता
वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सोमवारी सांगितले की, भारत अमेरिकेसोबतच्या प्राथमिक व्यापार कराराला अंतिम रूप देण्याच्या जवळ आहे, ज्यामुळे परस्परांवरील उच्च शुल्क (Tariffs) कमी होण्यास मदत होईल. मात्र, बाजाराला या विधानावर पूर्णतः विश्वास बसलेला नाही. व्यापार कराराला अंतिम स्वरूप कधी मिळेल, याबद्दलची अनिश्चितता अजूनही कायम असल्याने बाजारात नकारात्मक वातावरण आहे.
२. विदेशी गुंतवणूकदारांकडून शेअर्सची विक्री (FPI Outflow)
भारतीय शेअर बाजारातून विदेशी भांडवल बाहेर जाण्याचे प्रमाण वाढले आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) १५ डिसेंबरच्या आकडेवारीनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) भारतीय बाजारात १,४६८ कोटी रुपयांच्या समभागांची निव्वळ विक्री केली आहे. दुसरीकडे, देशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) १,७९२ कोटी रुपयांची खरेदी करून बाजार सावरण्याचा प्रयत्न केला असला तरी, विदेशी विक्रीचा दबाव रुपयावर स्पष्ट दिसत आहे.
३. डॉलरच्या मागणी आणि पुरवठ्यातील तफावत
रॉयटर्सच्या अहवालानुसार, बाजारात डॉलरची मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. नॉन- डिलिव्हरेबल फॉरवर्ड्स (NDF) मार्केटमधील पोझिशन्सची मॅच्युरिटी जवळ आल्याने डॉलरची खरेदी वाढली आहे. तसेच, स्थानिक कंपन्या आणि कॉर्पोरेट्सकडून वर्षअखेरीस (Year-end payments) करावयाच्या देयकांसाठी डॉलरची मोठी खरेदी सुरू आहे. त्यातच रिझर्व्ह बँकेचा (RBI) हस्तक्षेप मर्यादित राहिला आहे. एका सरकारी बँकेच्या डीलरने दिलेल्या माहितीनुसार, "ट्रेडर्स रुपयाला सतत खाली ढकलत आहेत. आरबीआय ९०.५० च्या पातळीवर हस्तक्षेप करेल अशी अपेक्षा होती, पण ती पातळी कधीच ओलांडली गेली आहे आणि आता रुपया सावरण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत."






