Home > Business > RBI Big Announcement : बाजारात पैशांची चणचण संपणार, आरबीआयचा ३ लाख कोटींचा 'बूस्टर डोस' जाहीर

RBI Big Announcement : बाजारात पैशांची चणचण संपणार, आरबीआयचा ३ लाख कोटींचा 'बूस्टर डोस' जाहीर

RBI's Big Announcement: The shortage of money in the market will end; RBI announces a ₹3 lakh crore 'booster dose'.

RBI Big Announcement : बाजारात पैशांची चणचण संपणार, आरबीआयचा ३ लाख कोटींचा बूस्टर डोस जाहीर
X

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बाजारातील पैशाची चणचण (Liquidity Crunch) दूर करण्यासाठी आरबीआयने 'ओपन मार्केट ऑपरेशन्स' (OMO) आणि विदेशी चलन विनिमय कराराच्या (Forex Swap) माध्यमातून बँकिंग व्यवस्थेत तब्बल ३ लाख कोटी रुपये ओतण्याची घोषणा केली आहे.

नेमका काय आहे आरबीआयचा प्लॅन ?

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सरकारी रोखे (Government Securities) खरेदी करून बँक २ लाख कोटी रुपये बाजारात आणणार आहे.

ही प्रक्रिया खालीलप्रमाणे चार टप्प्यांत पार पडेल :

२९ डिसेंबर: ५०,००० कोटी रुपये

५ जानेवारी: ५०,००० कोटी रुपये

१२ जानेवारी: ५०,००० कोटी रुपये

२२ जानेवारी: ५०,००० कोटी रुपये

याव्यतिरिक्त, १३ जानेवारी रोजी १० अब्ज डॉलर्सचा (सुमारे ८०-८५ हजार कोटी रुपये) तीन वर्षांचा 'बाय-सेल स्वॅप' व्यवहार केला जाईल, ज्यामुळे बाजारात अधिक पैसा उपलब्ध होईल.

हा निर्णय घेण्याची वेळ का आली ?

ताज्या आकडेवारीनुसार, सोमवारी बँकिंग व्यवस्थेत सुमारे ५४,८५२ कोटी रुपयांची तूट दिसून आली होती. गेल्या आठवड्यात रुपयाची घसरण रोखण्यासाठी आरबीआयने डॉलरची विक्री केली, ज्यामुळे बाजारातील रुपयांचे प्रमाण कमी झाले होते. त्यातच ॲडव्हान्स टॅक्स भरण्याचा कालावधी आणि चलनी नोटांची वाढती मागणी यामुळे बँकांकडील रोकड आटली होती.बाजारातील तज्ज्ञांना अपेक्षा होती की आरबीआय किमान २ लाख कोटींची मदत करेल, परंतु आरबीआयने त्याहून पुढे जात ३ लाख कोटींची तरतूद करून सुखद धक्का दिला आहे.

रुपयाची स्थिती आणि तज्ज्ञांचे मत

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ९१ वरून सावरत ८९ पर्यंत खाली आला आहे, पण यामुळे बाजारात पैशाची चणचण निर्माण झाली होती. यावर प्रतिक्रिया देताना एचडीएफसी बँकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ साक्षी गुप्ता म्हणाल्या, "परकीय चलन बाजारातील आरबीआयचा हस्तक्षेप पाहता, आता पैशाचा पुरवठा वाढवण्याचा हा निर्णय अगदी योग्य वेळी घेतला आहे. भविष्यातील परिस्थितीनुसार आरबीआय आणखी पावले उचलू शकते, पण सध्यातरी हा निर्णय मोठा आणि दिलासादायक आहे."


विशेष म्हणजे, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रेपो दरात कपात करूनही सरकारी रोख्यांचे दर (Bond Yields) वाढत आहेत. विश्लेषकांच्या मते, आरबीआयकडे आता 'कॅश रिझर्व्ह रेशो' (CRR) चे हत्यार वापरून झाल्यामुळे, 'ओपन मार्केट ऑपरेशन्स' (OMO) हेच बाजारातील समतोल राखण्यासाठी प्रमुख साधन उरले आहे.

या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आरबीआयने तब्बल ९.५ लाख कोटी रुपये बाजारात ओतले होते, ज्यामुळे डिसेंबर २०२४ मधील तूट भरून निघण्यास मोठी मदत झाली होती. आताच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा बाजारात पैसा खेळता राहण्यास मदत होईल.

Updated : 24 Dec 2025 8:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top