RBI Gold Reserves | आरबीआयच्या धोरणात मोठा 'यू-टर्न'?
सोने खरेदी थेट ९४ टक्क्यांनी घटली
X
जागतिक बाजारात सोन्याच्या वाढत्या किमती आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)
२०२५ मध्ये आपल्या सोने खरेदीच्या धोरणात मोठा बदल केला आहे. 'वर्ल्ड गोल्ड कौन्सिल'च्या ताज्या अहवालानुसार,
२०२५ मध्ये आरबीआयची सोने खरेदी गेल्या आठ वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचली आहे.
खरेदीत ९४ टक्क्यांनी घट
२०२४ मध्ये आरबीआयने तब्बल ७२.६ टन सोने खरेदी करून विक्रम केला होता.
मात्र, २०२५ मध्ये हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. या वर्षात बँकेने केवळ ४.०२ टन सोन्याची खरेदी केली. वर्षभरात सोने खरेदीत
थेट ९४% घट नोंदवण्यात आली आहे.
खरेदी कमी, तरीही साठा विक्रमी
विशेष म्हणजे, जरी नवीन खरेदीचे प्रमाण नगण्य असले, तरी आरबीआयच्या तिजोरीतील एकूण सोन्याचा साठा
(Gold Reserves) आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर आहे. २०२४ च्या शेवटी ८७६.१८ टन असलेला साठा २०२५ मध्ये ८८०.२ टन इतका झाला आहे.
नोव्हेंबर २०२५ पर्यंत आरबीआयच्या सोन्याच्या साठ्याचे मूल्य $१०० अब्ज डॉलर्सच्या वर पोहोचले आहे.
फॉरेक्स रिझर्व्हमध्ये सोन्याचा वाटा वाढला
सोन्याच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ (२०२५ मध्ये ६५% वाढ) आणि
२०२४ मधील मोठी खरेदी यामुळे भारताच्या परकीय चलन साठ्यात (Forex Reserves) सोन्याचा वाटा
लक्षणीयरीत्या वाढला आहे.एका वर्षात हा वाटा १०% वरून थेट १६% वर पोहोचला आहे.
पाच वर्षांपूर्वी (मार्च २०२१) हा वाटा केवळ ५.८७% होता. याचाच अर्थ, आरबीआयने आपल्या पोर्टफोलिओमध्ये
सोन्याला मोठे महत्त्व दिले आहे.
आरबीआयने खरेदी का थांबवली?
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते, आरबीआयने जाणीवपूर्वक हा 'पॉज' घेतला असावा.
परकीय चलन साठ्यात सोन्याचे प्रमाण आधीच १६ टक्क्यांपर्यंत वाढले आहे आणि सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे
जोखीम व्यवस्थापन (Risk Management) आणि समतोल राखण्यासाठी आरबीआयने
'मेझर्ड ॲप्रोच' (Measured Approach) स्वीकारल्याचे दिसते.
डॉलरची पिछेहाट?
केवळ भारतच नाही, तर जगभरातील मध्यवर्ती बँकांचा कल बदलला आहे:
जागतिक मध्यवर्ती बँकांकडे आता ३२,१४० टन सोने आहे.परकीय चलन साठ्यात आता डॉलर (४६%) नंतर सोन्याचा (२०%) दुसरा क्रमांक लागतो. सोन्याने युरोला (१६%) मागे टाकले आहे.
१९९६ नंतर प्रथमच, मध्यवर्ती बँकांकडे अमेरिकन ट्रेझरी बॉण्ड्सपेक्षा (US Treasuries) सोन्याचा साठा जास्त आहे.
सोनं नेमकं कुठे ठेवलंय?
आरबीआयने मे महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार देशांतर्गत साठा ५११.९९ मेट्रिक टन भारतात सुरक्षित आहे तर
३४८.६२ मेट्रिक टन बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स - BIS कडे सुरक्षित आहे.






