Home > Business > NPS Withdrawal Rules : पैशांची गरज आहे ? आता घरासाठी, लग्नासाठी NPS मधून काढा पैसे

NPS Withdrawal Rules : पैशांची गरज आहे ? आता घरासाठी, लग्नासाठी NPS मधून काढा पैसे

NPS Withdrawal Rules: Need money? Now you can withdraw money from NPS for your home or wedding.

NPS Withdrawal Rules : पैशांची गरज आहे ? आता घरासाठी, लग्नासाठी NPS मधून काढा पैसे
X

राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अर्थात 'एनपीएस' (NPS) धारकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. निवृत्तीनंतरचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी लोकप्रिय असलेल्या या योजनेत आता अधिक लवचिकता आणण्यात आली आहे. 'पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी'ने (PFRDA) जारी केलेल्या नवीन अधिसूचनांनुसार, आता एनपीएस खातेदारांना निवृत्तीपूर्वी आणीबाणीच्या प्रसंगी पैसे काढण्याचे नियम शिथिल केले आहेत.

या नवीन बदलांचा थेट परिणाम कोट्यवधी नोकरदार आणि सामान्य गुंतवणूकदारांवर होणार आहेत. नेमके बदल काय आहेत हे आपण सविस्तर समजून घेऊया.

१. आता तीन नव्हे, तर चार वेळा काढता येणार पैसे

पूर्वीच्या नियमांनुसार, एनपीएस खातेदाराला त्याच्या संपूर्ण सेवाकाळात केवळ तीन वेळाच पैशांची आंशिक उचल (Partial Withdrawal) करण्याची मुभा होती. मात्र, पीएफआरडीएच्या नवीन अधिसूचनेनुसार ही मर्यादा वाढवून आता चार वेळा करण्यात आली आहे. म्हणजेच, खातेदार वयाची ६० वर्षे पूर्ण होण्याआधी किंवा निवृत्तीआधी (Superannuation) ठराविक कारणांसाठी चार वेळा आपल्या खात्यातून पैसे काढू शकतो.

२. पैसे काढताना किती अंतर हवे ?

या नवीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी दोन वेळेस पैसे काढण्यामध्ये किमान ४ वर्षांचे अंतर असणे आवश्यक आहे. मात्र, जर एखादा खातेदार वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतरही एनपीएसमध्ये गुंतवणूक सुरू ठेवत असेल, तर त्यांच्यासाठी हा कालावधी ३ वर्षांचा असेल.

३. किती पैसे काढता येणार ?

सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पैसे काढण्याची मर्यादा. नवीन नियमांनुसार, खातेदाराला त्याच्या स्वतःच्या योगदानाच्या (Own Contribution) जास्तीत जास्त २५ टक्के रक्कमच काढता येईल. येथे हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, नियोक्ता (Employer) किंवा सरकारने जमा केलेल्या रकमेतून कोणताही हिस्सा काढता येणार नाही. केवळ तुम्ही स्वतः जमा केलेल्या रकमेवरच हा हक्क असेल.

४. कोणत्या कारणांसाठी पैसे काढता येतील ?

फक्त गंभीर आणि अपरिहार्य कारणांसाठीच ही आंशिक उचल करण्याची परवानगी देण्यात आली आहे:

मुलांचे उच्च शिक्षण.

मुलांचे लग्न (कायदेशीररित्या दत्तक घेतलेल्या मुलांसह).

स्वतःच्या किंवा जोडीदाराच्या नावे घर किंवा फ्लॅट खरेदी/बांधकाम करण्यासाठी.

गंभीर आजारांवरील उपचारांसाठी (स्वतः, जोडीदार, मुले किंवा आश्रित पालकांसाठी).

५. आता एनपीएसवर कर्ज घेणे शक्य !

या अधिसूचनेतील आणखी एक महत्त्वपूर्ण बदल म्हणजे कर्जाची सुविधा. आता एनपीएस खातेदार उच्च शिक्षण, लग्न, घर खरेदी किंवा आजारपणासाठी बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊ शकतात. यासाठी एनपीएस खात्यातील जमा रकमेवर 'लीन' (Lien) किंवा बोजा चढवण्याचा अधिकार असेल. याचा अर्थ असा की, तुमची एनपीएसमधील गुंतवणूक तारण ठेवून तुम्हाला कर्ज मिळू शकेल. कर्जासाठीची ही मर्यादा देखील तुमच्या स्वतःच्या योगदानाच्या २५ टक्क्यांपर्यंतच असेल.

एकूणच एनपीएस ही मुळात दीर्घकालीन निवृत्ती नियोजनासाठीची योजना आहे. मात्र, आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर पैशांची गरज भासल्यास आता खातेदारांना अधिक मोकळीक मिळाली आहे. विशेषतः गृहखरेदी आणि मुलांच्या शिक्षणासाठी केलेली ही तरतूद मध्यमवर्गीयांसाठी फायदेशीर ठरू शकते.

Updated : 17 Dec 2025 1:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top