Home > Business > Maharashtra Sugar Production 2025 साखर उत्पादनात महाराष्ट्राची मुसंडी !

Maharashtra Sugar Production 2025 साखर उत्पादनात महाराष्ट्राची मुसंडी !

उत्तर प्रदेशला पछाडत मिळवला पहिला क्रमांक

Maharashtra Sugar Production 2025 साखर उत्पादनात महाराष्ट्राची मुसंडी !
X

देशाच्या साखर उद्योगात महाराष्ट्राचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. चालू गळीत हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यांतच (ऑक्टोबर-नोव्हेंबर) महाराष्ट्राने साखर उत्पादनात मोठी झेप घेत पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या उत्तर प्रदेशला मागे टाकले आहे. 'इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन'ने (ISMA) जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने दमदार कामगिरी करत देशाच्या एकूण साखर उत्पादनात सिंहाचा वाटा उचलला आहे.

महाराष्ट्रात किती साखर उत्पादन ?

'इस्मा'च्या आकडेवारीनुसार, चालू हंगामातील सुरूवातीच्या दोनच महिन्यात महाराष्ट्राचे साखर उत्पादन १.६९ दशलक्ष टनांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हे उत्पादन अवघे ४.६० लाख टन इतके होते. दुसरीकडे, देशातील सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशचे उत्पादन १.४० दशलक्ष टन इतके झाले आहे. या आकडेवारीवरून सुरुवातीच्या टप्प्यातच महाराष्ट्राने उत्तर प्रदेशवर स्पष्ट आघाडी घेतल्याचे दिसून येते.

देशाच्या उत्पादनात ४३% वाढ

केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरही साखर उद्योगासाठी हा हंगाम सकारात्मक दिसत आहे. देशाचे एकूण साखर उत्पादन ४३ टक्क्यांनी वाढून ४.११ दशलक्ष टनांवर गेले आहे (गेल्या वर्षी ते २.८८ दशलक्ष टन होते).

इतर राज्यातील साखरेचे उत्पादन किती ?

कर्नाटक- तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकात शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सुरुवातीला गाळपात व्यत्यय आला. त्यामुळे उत्पादन ८.१२ लाख टनांवरून घसरून ७.७४ लाख टनांवर आले आहे.

गुजरात - ९२,००० टन.

तामिळनाडू- ३५,००० टन.

या हंगामात साखरेचे उत्पादन किती होणार ?

'इस्मा'च्या अंदाजानुसार, २०२५-२६ या गळित हंगामात देशाचे एकूण साखर उत्पादन (इथेनॉलसाठी वळवलेला ऊस वगळून) ३०.९५ दशलक्ष टन राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन २६.११ दशलक्ष टन होते.

साखरेचे उत्पादन का वाढले ?

उत्पादनातील या वाढीमागे महत्त्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्रासह प्रमुख राज्यांमध्ये वाढलेले उसाचे हेक्टरी उत्पादन (Yield) आणि साखरेचा सुधारलेला उतारा (Recovery Rate). तसेच, यंदा गाळप हंगाम वेळेत आणि वेगाने सुरू झाला आहे. सध्या देशात ४२८ साखर कारखान्यांचे धुराडे पेटले आहेत, गेल्या वर्षी याच काळात ही संख्या ३७६ होती.

दरवाढीची मागणी वाढली

एकीकडे उत्पादन वाढले असले तरी, साखर कारखान्यांसमोर आर्थिक आव्हाने कायम आहेत. 'इस्मा'ने केंद्र सरकारकडे साखरेच्या किमान विक्री किमतीत (MSP) तातडीने वाढ करण्याची मागणी केली आहे.

गेल्या ६ वर्षांपासून साखरेची MSP वाढलेली नाही. उत्तर प्रदेश, कर्नाटक, पंजाब आणि हरियाणात उसाचे दर वाढल्याने साखरेचा सरासरी उत्पादन खर्च ४१.७२ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एफआरपी (FRP) वेळेवर देण्यासाठी MSP वाढवणे अपरिहार्य असल्याचे उद्योगाचे म्हणणे आहे.

इथेनॉल धोरणाबाबत चिंता

साखर उद्योगाला सावरण्यासाठी इथेनॉल खरेदीच्या किमतीत वाढ करण्याची गरज 'इस्मा'ने व्यक्त केली आहे. २०२५-२६ साठी साखर क्षेत्राला केवळ २.८९ अब्ज लिटर इथेनॉल पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, जे एकूण क्षमतेच्या केवळ २७.५ टक्के आहे. यामुळे डिस्टिलरी क्षमतेचा पूर्ण वापर होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.

Updated : 2 Dec 2025 2:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top