Gold Silver Price Update : सोनं महागलं, चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड !
Gold Silver Price Update: Gold has become more expensive, and silver has broken all records!
X
अमेरिकन फेडरल रिझर्व्हने (US Federal Reserve) व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात केल्यानंतर भारतीय कमोडिटी बाजारात (MCX) सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी पाहायला मिळाली. सोन्याचे दर अर्ध्या टक्क्यांहून अधिक वधारले आहेत, तर चांदीने आतापर्यंतच्या सर्व विक्रमी उच्चांकाला (All-time high) स्पर्श केला आहे. फेडच्या या निर्णयामुळे डॉलर कमकुवत झाला असून, त्याचा थेट फायदा मौल्यवान धातूंना मिळाला आहे.
गुरुवारी सकाळी ९:४५ च्या सुमारास एमसीएक्सवर (MCX) फेब्रुवारी वायद्याचे सोने ०.६० टक्क्यांनी वधारून १,३०,५७५ प्रति १० ग्रॅम वर पोहोचले. दुसरीकडे, चांदीमध्ये अधिक तेजी दिसून आली. मार्च वायद्याची चांदी २.४२ टक्क्यांनी उसळून १,९३,३०० प्रति किलो वर व्यवहार करत होती. तत्पूर्वी, चांदीने १,९३,४५२ प्रति किलो असा नवा ऐतिहासिक उच्चांक नोंदवला. आंतरराष्ट्रीय बाजारातही हेच चित्र आहे. फेब्रुवारीच्या अमेरिकन सोन्याच्या फ्युचर्समध्ये १ टक्क्यांहून अधिक वाढ होऊन ते ४,२७१.३० डॉलर्स प्रति औंसवर पोहोचले आहेत, तर चांदीनेही जागतिक बाजारात नवा उच्चांक गाठला आहे.
फेडच्या निर्णयाचा अर्थ काय ?
युएस फेडरल ओपन मार्केट कमिटीने (FOMC) १० डिसेंबर रोजी सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात केली. यामुळे अमेरिकेतील व्याजदर आता ३.५०% ते ३.७५% या श्रेणीत आले आहेत. २०२२ नंतरचा व्याजदराचा हा नीचांक आहे. या वर्षभरात फेडने एकूण ०.७५ टक्क्यांनी व्याजदर कमी केले आहेत. तसेच, पुढील वर्षी आणखी एका कपातीचे संकेत दिले आहेत जेव्हा व्याजदर कमी असतात, तेव्हा सोन्यासारख्या 'नॉन-यिल्डिंग' (व्याज न देणाऱ्या) मालमत्तेत गुंतवणूक वाढते. डॉलर इंडेक्समध्ये ०.२५% घसरण झाल्याने सोन्याच्या किंमतींना आधार मिळाला आहे,अशी माहिती तज्ज्ञांनी दिलीय.
महाराष्ट्रात सोनं-चांदीचे दर किती ?
महाराष्ट्रातील सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्याने जागतिक बाजारात तेजी आली असून, त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारावर झाला आहे.
मुंबई आणि पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा भाव आज अंदाजे १ लाख ३० हजार ५०० रुपये (प्रति १० ग्रॅम) असून, दागिन्यांसाठी लागणाऱ्या २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख १९ हजार ६०० रुपयांच्या आसपास आहे.
सुवर्णनगरी जळगावात शुद्ध सोन्याचा (२४ कॅरेट) भाव १ लाख ३० हजार २०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे.नागपूरच्या सराफा बाजारातही २४ कॅरेट सोन्याचे दर १ लाख ३० हजार ४०० रुपयांच्या घरात आहेत.
चांदीने सर्व रेकॉर्ड मोडले असून, मुंबई, पुणे आणि जळगावात एक किलो चांदीचा भाव २ लाख १ हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. विशेष म्हणजे हे दर जीएसटी आणि घडणावळ विरहित आहेत, त्यामुळे दुकानात अंतिम भाव यापेक्षा जास्त असू शकतात. काही स्थानिक बाजारांत चांदीमध्ये एकाच दिवसात हजारो रुपयांची वाढ होऊन ती २ लाख ९ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याच्या बातम्या आहेत.






