Gold-Silver Price Record अमेरिकेच्या एका संकेताने सोन्याला झळाळी, चांदीने रचला इतिहास ; वाचा दरवाढीचे कारण
Gold-Silver Price Record A signal from the US sent gold soaring, silver created history; Read the reason for the price hike
X
जागतिक अर्थकारणात अमेरिकेच्या 'फेडरल रिझर्व्ह'च्या धोरणांचे वारे ज्या दिशेने वाहतात, तिथेच मौल्यवान धातूंची दिशा ठरते, याचा प्रत्यय सोमवारी पुन्हा एकदा आला. अमेरिकेत या महिन्यात होणाऱ्या संभाव्य व्याजदर कपातीची चर्चा आणि फेडरल रिझर्व्हच्या नेतृत्वातील बदलांचे संकेत यामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याने मागील सहा आठवड्यांचा उच्चांक गाठला असून, चांदीने आजवरच्या इतिहासातील सर्वोच्च पातळीला स्पर्श करत नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे.
दरांचे सध्याचे चित्र जागतिक बाजारात स्पॉट गोल्डच्या (Spot Gold) किंमतीत ०.६ टक्क्यांनी वाढ होऊन त्या ४,२५५.०४ डॉलर प्रति औंसवर पोहोचल्या आहेत. २१ ऑक्टोबरनंतरची ही सोन्याची सर्वोच्च पातळी आहे. त्याचवेळी, फेब्रुवारी वायदा बाजारातील (Futures) सोन्याचे दर ०.८ टक्क्यांनी वधारून ४,२९०.४० डॉलरवर गेले आहेत. दुसरीकडे, चांदीने ५७.८६ डॉलरचा सार्वकालिक उच्चांक (All-time high) गाठला आणि व्यवहारअंती ती २.२ टक्क्यांच्या वाढीसह ५७.६३ डॉलर प्रति औंसवर स्थिरावली.
महाराष्ट्रात सोनं-चांदीचे दर किती ?
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्यानंतर महाराष्ट्रातील सराफा बाजारातही सोनं आणि चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहेत. जीएसटी वगळता सोन्याचे दर प्रति तोळा १ लाख २९ हजार ५०० पर्यंत पोहचले आहेत तर चांदीचा एक १७६ प्रति ग्रॅम एवढा झाला आहे.
सोनं-चांदीच्या दराच्या तेजीचे कारण काय ?
या दरवाढीचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील बदलती समीकरणे.बाजारातील गुंतवणूकदार आता डिसेंबरमध्ये फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात केली जाईल, हे गृहीत धरून चालले आहेत. त्यातच फेडरल रिझर्व्हचे (FOMC) आगामी अध्यक्ष हे 'डोव्हिश' (Dovish) म्हणजेच मवाळ आणि व्याजदर कमी करण्याच्या बाजूने असतील, अशी दाट शक्यता आहे. या दोन्ही गोष्टींमुळे सोन्यातील गुंतवणुकीला मोठा आधार मिळत आहे."
चांदीच्या बाबतीत केवळ सोन्याचा प्रभाव नाही, तर आगामी वर्षात वाढणारी औद्योगिक मागणी (Industrial Demand) हे देखील एक प्रमुख कारण असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
डिसेंबरमध्ये व्याजदर कपात होण्याची शक्यता आता ८८ टक्क्यांपर्यंत वर्तवली जात आहे. जेव्हा व्याजदर कमी होतात, तेव्हा सोन्यासारख्या 'नॉन-यिल्डिंग' (व्याजी उत्पन्न न देणाऱ्या) धातूंमध्ये गुंतवणूक वाढते, हा अर्थशास्त्राचा साधा नियम येथे लागू होताना दिसत आहे. ख्रिसमसपूर्वी ट्रम्प फेडच्या नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे.






