‘थर्ड वर्ल्ड’ देशांना अमेरिकेत प्रवेशबंदी ! भारत खरंच ‘थर्ड वर्ल्ड’ देश आहे का ?
X
व्हाईट हाऊसच्या परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमेरिकेच्या इमिग्रेशन अर्थात स्थलांतर धोरणात मोठे बदल करण्याचे संकेत देत, ट्रम्प यांनी "थर्ड वर्ल्ड कंटरीज" (Third World Countries) किंवा 'तिसऱ्या जगातील देश' मानतात, तिथून होणाऱ्या स्थलांतरावर कायमस्वरूपी बंदी (Permanently pause) घालण्याची घोषणा केली आहे.
अमेरिकेने तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली असली तरी, चुकीच्या स्थलांतर धोरणांमुळे अमेरिकन नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा खालावला आहे, असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलंय. "मी 'थर्ड वर्ल्ड' देशांमधून होणारे स्थलांतर कायमस्वरूपी थांबवेन,असा इशाराही ट्रम्प यांनी दिलाय. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बायडेन यांच्या कार्यकाळात बेकायदेशीरपणे लाखो नागरिकअमेरिकेत आले आहेत. या नागरिकांना अमेरिकेबद्दल प्रेम नाही उलट त्यांचा त्रास अमेरिक नागरिकांना होत असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलंय. पाश्चात्य संस्कृतीशी (Western Civilization) जुळवून न घेणाऱ्या आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांना परत पाठवले जाईल,असा इशाराही ट्रम्प यांनी दिलाय. ट्रम्प यांनी इशारा देताना कोणत्याही विशिष्ट देशांची यादी जाहीर केलेली नाही, त्यामुळे या निर्णयाची व्याप्ती नक्की काय असेल, यावर सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत.
'थर्ड वर्ल्ड' किंवा 'तिसरे जग' म्हणजे नक्की काय ?
या संज्ञेचा उगम समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावावे लागेल. १९५२ मध्ये फ्रेंच लोकसंख्याशास्त्रज्ञ अल्फ्रेड सॉव्ही (Alfred Sauvy) यांनी हा शब्द पहिल्यांदा वापरला. शीतयुद्धाच्या (Cold War) काळात जगाची विभागणी दोन प्रमुख गटांत झाली होती. नाटो (NATO) कराराशी जोडलेले देश म्हणजे 'पहिले जग' (First World) आणि सोव्हिएत रशियाच्या कम्युनिस्ट गटाशी जोडलेले देश म्हणजे 'दुसरे जग' (Second World).जे देश या दोन्ही गटांत सामील नव्हते, त्यांना 'तिसरे जग' किंवा अलिप्ततावादी मानले गेले. गंमत म्हणजे, या ऐतिहासिक व्याख्येनुसार स्वित्झर्लंड, फिनलंड आणि ऑस्ट्रियासारखे देशही तेव्हा 'तिसऱ्या जगात' मोडत होते, मात्र आजच्या संदर्भात ते विचित्र वाटते.
व्याख्येतील बदल आणि आधुनिक अर्थ
१९९१ मध्ये सोव्हिएत युनियनच्या विभाजनानंतर या शब्दाचा मूळ राजकीय अर्थ संपला. आजच्या काळात 'थर्ड वर्ल्ड' या शब्दाचा वापर प्रामुख्याने आर्थिक निकषांवर केला जातो. जिथे गरिबी जास्त आहे, राजकीय किंवा आर्थिक अस्थिरता आहे आणि औद्योगिकीकरण कमी आहे, अशा देशांना 'तिसरे जग' संबोधले जाते.मात्र, हा शब्द वापरणे आता जागतिक स्तरावर अपमानकारक आणि जुनाट (outdated) मानले जाते. 'पहिले जग' म्हणजे श्रेष्ठ आणि 'तिसरे जग' म्हणजे कनिष्ठ, अशी जी उतरंड यातून निर्माण होते, ती अनेकांना मान्य नाही.
या शब्दातील नकारात्मकता टाळण्यासाठी संयुक्त राष्ट्र (UN) आणि जागतिक बँकेने अधिक नेमके शब्द प्रचलित केले आहेत. उदाहरणार्थ , 'विकसनशील देश' (Developing countries) किंवा 'अल्पविकसित देश' (Least Developed Countries) सध्या संयुक्त राष्ट्रांच्या यादीत ४४ देश 'अल्पविकसित' म्हणून ओळखले जातात. यात प्रामुख्याने आफ्रिकेतील ३२ (उदा. अंगोला, युगांडा, झांबिया) आणि आशियातील ८ (उदा. बांगलादेश, नेपाळ, अफगाणिस्तान) देशांचा समावेश आहे.
मग भारताचा समावेश 'या' यादीत होतो का ?
आता कळीचा प्रश्न हा की, ट्रम्प यांच्या संभाव्य बंदीच्या यादीत भारत येईल का? याचे उत्तर ट्रम्प कोणती व्याख्या वापरतात, यावर अवलंबून आहे.
१. ऐतिहासिक निकष: शीतयुद्धाच्या काळात भारत अलिप्ततावादी चळवळीचा भाग होता. त्यामुळे अल्फ्रेड सॉव्ही यांच्या जुन्या व्याख्येनुसार भारत 'तिसऱ्या जगात' मोडतो.
२. संयुक्त राष्ट्रांचे निकष: आधुनिक आर्थिक निकषांनुसार, भारत हा 'विकसनशील देश' (Developing country) आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ४४ 'अल्पविकसित' (LDC) देशांच्या यादीत भारताचा समावेश नाही.
३. मानवी विकास निर्देशांक (HDI): असे असले तरी, 'वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू'च्या माहितीनुसार, मानवी विकास निर्देशांकाचा (HDI ०.६८५) विचार केल्यास भारताचा उल्लेख 'थर्ड वर्ल्ड' असा केला जाऊ शकतो.
थोडक्यात सांगायचे तर, प्रस्थापित जागतिक मानकांनुसार भारत अल्पविसित देशांच्या यादीत येत नाही. परंतु, ट्रम्प यांचे धोरण व्याख्येपेक्षा 'अमेरिका फर्स्ट' या राजकीय अजेंड्यावर अधिक आधारित असते. त्यांनी अद्याप देशांची नावे स्पष्ट केलेली नसल्याने, जोपर्यंत अधिकृत यादी बाहेर येत नाही, तोपर्यंत भारताबाबतची अनिश्चितता किंवा काही अंशी धोका नाकारता येत नाही.






