घुसखोरी रोखण्याचा प्रत्येक देशाला अधिकार- ट्रम्प

Update: 2020-02-24 09:34 GMT

घुसखोरांपासून आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्याचा प्रत्येक देशाला अधिकार आहे, असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. मोटेरा स्टेडियममध्ये सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी सुमारे १ लाख लोकांसमोर केलेल्या भाषणात भारताच्या विविधतेतील एकतेचा उल्लेख करत भारताचं कौतुक केल. भारतातील धार्मिक आणि भाषेतील विविधता आणि त्यातील एकता ही जगासाठी प्रेरणादायक आहे, असंही ते म्हणालेत. नमस्ते ट्रम्प या भव्य सोहळ्यात ट्रम्प यांनी पाक पुरस्कृत दहशतवाद, संरक्षण साहित्य करार, अमेरिकेतील व्हिसाचे नियम या सर्व विषयांवर भाष्य केले. भारतात सध्या सीएएवरुन सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचं देशातील विविधेतील एकतेबाबतचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

मुस्लिम दहशतवादाविरोधात कडक कारवाई करण्यासाठी तसंच दक्षिण आशियातील तणाव कमी करण्यासाठी अमेरिका पाकिस्तानसोबत काम करत आहे, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. पाकिस्तानसोबत आमचे संबंध अतिशय चांगले असून दहशतवादाविरोधात कारवाईसाठी पाकसोबत काम सुरू असल्याचं ट्रम्प यावेळी म्हणाले. तसंच अमेरिका भारताला ३ बिलीयन डॉलरची अत्याधुनिक शस्त्र देणार आहे आणि त्याबाबतचा करार मंगळवारी होईल अशी घोषणाही ट्रम्प यांनी केली.

रखरखत्या उन्हात ट्रम्प यांनी जोशपुर्ण भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी भारत आणि अमेरिकेनं केलेल्या प्रगतिचा आढावा घेतला. मोदी यांच्या नेतृत्वात भारतानं आर्थिक प्रगती केली आहे. व्यापार करण्सायासाठी येणारे अडथळे मोदी सरकारनं कमी केल्याचही ते म्हणाले. मोदी यांच कौतूक करतांना, ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात अमेरिकेने केलेल्या प्रगतिचा लेखाजोखा त्यांच्या अनोख्या स्टाईलमध्ये मांडला. अमेरिकेत आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त रोजगार निर्मीती केल्याची आठवण त्यांनी करुन दिली.

लष्करामध्ये आधुनिक व्यापक बदल करुन जगातील सर्वात बेस्ट आर्मी बांधल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी केला.अमेरिकेने सिरीया, इराकमधून आयसिसचा नायनाट केला. आयसिसचा म्होरक्या अबु बक्र अल बगदादी याला ठार केल्याचही त्यांनी आपल्या भाषणात आवर्जुन सांगितल.भारतासोबत ट्रेड डिल करायला आम्ही तयार आहोत. मात्र बोलणी टफ होईल असा इशाराही त्यांनी आपल्या भाषणात दिला.

Similar News