शरद पवारांची पत्रकार परिषद, काय बोलणार?

Update: 2019-09-25 09:09 GMT

आज दुपारी साडेतीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद होत आहे. सहाजिकच शरद पवार आज काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत उत्तुंग नेतृत्व असलेले शरद पवार यांना ईडीने नोटीस बजावली आहे. गेल्या पन्नास वर्षांच्या काळात शरद पवार यांच्यावर अनेक आरोप झाले.

शरद पवार यांच्याबरोबरच अजित पवार यांच्यासह अनेकांना नोटीसा आल्या आहेत. खरंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील हा टर्निंग पॉईंट आहे. जाणकारांच्या मते राजकारणातील अत्यंत पराकोटीचा निर्णय शिवसेना-भाजप सरकारने घेतला आहे. शरद पवार यांना नोटीस आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त आहेत. तर शिवसेनेसह इतर पक्षातील कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात शरद पवार यांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिकेमुळे पवारांनाही चौकशीच्या फेऱ्यात ठेवायचं अशी रणनीती भाजपने आखल्याचं सूत्रांनी सांगितले आहे. याच मुद्द्यावर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका जिंकायच्या असा रणनीतीचा भाग आहे. त्यामुळे शरद पवार या रणनितीला कसं उत्तर देतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपकडे वळत आहेत. इतकंच नाही तर भाजपने छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनाही आपल्या गोटात घेतलं आहे. एक एक करून अनेक आमदार आणि नेते फुटले तरी शरद पवार यांनी 80 वर्षानंतर ही परिस्थितीला ताब्यात ठेवण्यासाठी मैदानात उडी घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची होत असलेली वाताहत थांबावी म्हणून पवारांनी डॉक्टर अमोल कोल्हे कोल्हे, धनंजय मुंडे आणि अमोल मिटकरी यांना पुढे करत राष्ट्रवादीची घोडदौड पुढे सुरु ठेवली आहे. त्यामुळे भाजपच्या एका गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शरद पवार राजकीय चमत्कार घडवतील. अलिकडे पवारांच्या दौऱ्याला मिळत असलेला प्रतिसाद पाहता भाजपच्या गोटात अस्वस्थता होती. त्यातच शरद पवारांनी सर्व सूत्रं आपल्या हाती घेत नवीन पिढीला साद घालत भाजपला आव्हान दिले.

उदयराजे भोसले यांच्या साताऱ्यात शरद पवार यांच्या मिळालेल्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंता निर्माण झाली. त्यातच शिवसेनेने शरद पवारांची बाजू घेत भाजपवर टीका केली आहे. आज शरद पवार पत्रकार परिषदेत या सर्वांची उत्तरे देतील आणि विधानसभेची लढाई अधिकच मजेदार होईल हे निश्चित आहे.

Similar News