शरद पवार – अमित शाह भेट, साखरेच्या प्रश्नावरील चर्चा 'गोड' ठरणार?

Update: 2021-08-03 12:38 GMT

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली आहे. या दोघांच्या भेटीने पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले आहे. ही भेट साखर उद्योगाच्या प्रश्नावर असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. या भेटीसंदर्भात आणि भेटीचे कारण काय याची माहिती शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन दिली आहे. पण गेल्या काही दिवसात शरद पवार यांची पंतप्रधान मोदी आणि नंतर आता अमित शाह यांच्याशी भेट झाल्याने राजकीय चर्चांना सुरूवात झाली आहे.

"सहकारी साखऱ कारखान्यांना येणाऱ्या अडचणीं संदर्भात चर्चा करण्यासाठी सहकारी साखर कारखान्यांच्या फेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासोबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून नियुक्त झालेल्या अमित शाह यांचे अभिनंदन केले. या भेटी दरम्यान आम्ही देशातील साखर उद्योगाची सद्यस्थिती आणि साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर चर्चा केली. किमान आधारभूत किंमत आणि साखर कारखान्यांच्या परिसरात इथेनॉल निर्मिती प्रकल्प सुरू करण्यास परवानगी या दोन महत्त्वाचे मुद्दे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच आम्ही मांडलेल्या मुद्द्यांचा सकारात्मक दृष्टीने विचार करुन ते लवकरात लवकर समस्या सोडवतील, अशी अपेक्षा आहे " अशी माहिती शरद पवार यांनी ट्विट करुन दिली आहे.

Similar News