१७ वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण...

Update: 2023-02-02 14:50 GMT

आजही पिण्याच्या पाण्यासाठी अमरावतीच्या कान्होली येथील नागरिकांना वणवण करावी लागत आहे. २००७ पासून त्यांची हि वणवण सुरु आहे. पण प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कानापर्यत आवाज पोहचूनही त्यावर कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही.

देशाला स्वातंत्र्या मिळून आज ७५ पूर्ण झाली तरी राज्यातील काही ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील कान्होली या ठिकाणी २००७ मध्ये महापूर आल्याने गावात नागरिकांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. त्यामध्ये जवळपास ३० ते ३५ घरांचे नुकसान झाले होते. त्यानंतर प्रशासनाच्यावतीने या महापुरात नुकसान झालेल्या नागरिकांना गावाच्या बाहेर त्यांचे पुनर्वसन करून देण्यात आले. मात्र आजही इथले नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी कोसो दूर पायपिट करताना पाहायला मिळत आहेत.

पूरग्रस्तांना गावाच्या बाहेर घरे बांधण्यासाठी जागा व अनुदान सुद्धा देण्यात आले. मात्र या रहिवासियांना मुलभूत सोयीसुविधा प्रशासनाने आजही उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत. गेल्या १७ वर्षांपासून या पुनर्वसन भागातील नागरिकांना अद्यापही पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे आजही या नागरिकांना गावांमध्ये पायी जाऊन दररोज सकाळी आणि संध्याकाळी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला पिण्याच्या पाण्यासाठी वारंवार निवेदने दिली आहेत. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आता या पुनर्वसन भागातील नागरिकांनी केलेला आहे. राज्य सरकार पुनर्वसन करताना तिथे मुलभूत सोयी-सुविधा देणे हे क्रमप्राप्त आहे. अशावेळी पुनर्वसन करून सरकार आपले हात झटकून मोकळे होते. मात्र त्यांना मुलभूत सोयी सुविधा कोण देणार? हा खरा प्रश्न आहे.

Tags:    

Similar News