रायगड जिल्ह्यात पुराच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत

Update: 2019-08-09 16:50 GMT

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. मागील २४ तासात दिवसभरात जिल्ह्यात २५२.४० मी.मी एवढा पाऊस पडला आहे. नदीचे व पुराचे पाणी किनाऱ्यालगत असलेल्या गावात शिरले असून सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. घरं आणि बाजारपेठात पुराचे पाणी शिरल्याने करोडो रुपयाचे नुकसान झाले आहे. नागोठाणे, कोळीवाडा पुराच्या तडाख्यात सापडले आहे. कोळी वाड्यातील सर्व घरातील जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे पुरात वाहून गेल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.

पुराचे पाणी रात्री अचानक वाढल्याने येथील नागरिक जीव मुठीत घेऊन घराच्या पोट माळ्यावर उपाशी बसले होते. अशातच विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. सन १९८९, २००५ साली देखील अशाच स्वरूपाचा महापूर आला होता. या पुराने जनजीवन विस्कळीत झाले होते. २०१९ या वर्षी पुन्हा एकदा नागरिकांनी पुराच्या प्रलयाचा सामना केला आहे.

रायगड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे आजपर्यंत मृतांचा आकडा 26 वर पोहोचला आहे. तसेच 19 सार्वजनिक मालमत्ता, 2440 खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आतापर्यंत 6 कोटी 42 लाख 76 हजार 596 रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. तर अजूनही जिल्ह्यातील अनेक भागातील पंचनामे करणे बाकी आहे. अंतिम आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आत्तापर्यंत 520 कुटुंबाना सुरक्षिततेच्या दृष्टीने स्थलांतरित करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड जिल्ह्यात 6 ऑगस्टपर्यंत सरासरी 3 हजार 213 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पाऊस आणि त्यामुळे आलेल्या आपत्तीत आजवर 26 जणांचे बळी गेले आहेत. अनेक ठिकाणी जीवितहानी देखील झाल्याचे दिसून आले आहे.

नागोठाणे येथील घरे व बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले असून लहान मोठे व्यावसाईकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पुराच्या पाण्यात नागोठाणे वरवठने येथील तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. नागोठणे येथील अनेक घरात व दुकानात १५ फुटांपेक्षा अधिक पाणी होते. रात्रीची वेळ असल्याने व काळोख असल्याने स्वतःचा जीव वाचविणे हेच प्रत्येका पुढे मोठे आव्हान होते. या पुराने घरातील सर्व साहित्य महापुरात वाहून गेले आहेत. अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे. नैसर्गिक आपत्तीत उध्वस्त झालेल्या पूरग्रस्तांनी शासनाकडून नुकसाभरपाईची मागणी केली आहे.

कोळीवाड्यातील रुक्मिणी विठोबा पाटील या वृध्द महिलेने सांगितले की, घरात पुराचे पाणी शिरले तेव्हा घरात पुरुष मंडळी कुणीच नव्हतं. नवीन घर बांधून वास्तूशांती झाल्याने घरात सर्व नवीन साहित्य हौशेने मांडून ठेवले होते. घरातील सर्व साहित्य वाहून गेले. जीवनावश्यक वस्तू व धान्य वाहून गेले. उपासमारीची वेळ आली कुणीच मदत केली नाही. असं रुक्मीणीने मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितले.

कोळी वाड्यातील होडीचा धंदा असणाऱ्या वृषाली संतोष पाटील सांगतात की, आमचा होडीचा धंदा आहे. पावसाळ्यात चार महिने बंद असतो. घरात साठविलेले धान्य वाहून गेल्याने माझ्या कुटुंबाची उपासमार सुरू आहे. आणि आता धंदा बंद असल्याने आम्ही काय खायचं असा सवाल आमच्या समोर आहे.

बाजारपेठतील दुकानदार अशोक भंडारी म्हणाले की मागील ३५ ते ४० वर्षापासून बांगडी व कॉस्मेटिक चे दुकान चालवत आहे. सणासाठी ७० हजाराची राखी आणली होती. सर्व राखी व इतर साहित्याचे मोठं नुकसान झालं आहे. असं म्हणत अशोक यांनी सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

गणेश विठोबा पाटील या ग्रामस्थाने सांगितले की, सलग चार दिवस पुराचे पाणी घरात शिरले होते. येथील जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले होते. मात्र, आपत्तीग्रस्तांना धीर देण्यास व मदतीसाठी प्रशासनाचे कुणीच पुढे आले नाहीत.

सदानंद नामदेव पाटील म्हणतात १५ फुटाहून अधिक पुराचे पाणी शिरल्याने अन्नधान्य, कपडे, टिव्ही व फ्रिज तसेच सर्व साहित्य वाहून गेले. आता पुन्हा घडी बसविणे कठीण आहे. सरकारने आम्हाला मदत द्यावी.

ज्योती विठोबा वाघमारे यांनी सांगितले की, माझे भाजीचे दुकान आहे. पुराच्या पाण्यात दुकान मोडून पडले. तसेच घराचे देखील नुकसान झाले. आता जगायचं कसं असा प्रश्न सतावत आहे.

या संदर्भात रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना पुरस्थितीमुळे नागरिकांच्या घराचे व भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले असल्याचं सांगत भारतीय हवामानखात्याने अतिवृष्टी चा इशारा दिला असल्याने अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं आहे. तसंच नुकसानग्रस्त व आपत्तीग्रस्त लोकांना नुकसानभरपाई देण्याच्या दृष्टीने आपण प्रशासन प्रयत्नशील असल्याचं सुर्यवंशी यांनी म्हटलं आहे.

खासदार सुनिल तटकरे यांनी नागोठाणेसह जिल्ह्याला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. अशावेळी प्रशासनाने नजर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना केली आहे. तसंच याबरोबरच येथील घरात व बाजारपेठेतील दुकानात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. नागरिक व व्यापाऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खा. तटकरे यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितले.

पाहुयात संबंधित व्हिडिओ...

https://youtu.be/A_zrklYLszo

 

Similar News