महाराष्ट्रातील कौशल्य विकासासाठी आयआयएस महत्त्वपूर्ण ठरेल - मुख्यमंत्री

Update: 2019-08-14 17:19 GMT

कौशल्य विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स ही संस्था मुंबईत स्थापन करण्यात येणार आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आणि स्वागतार्ह असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकतामंत्री महेंद्र नाथ पांडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची आज सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री पांडे यांनी कौशल्य विकासाच्या धोरणाबाबत माहिती दिली, तसेच विविध विषयांवर चर्चा केली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात मुंबई, अहमदाबाद आणि कानपूर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स स्थापन करण्यात येत आहेत. मुंबईतील संस्थेच्या स्थापनेत टाटा ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र हे कौशल्य विकास क्षेत्रातील आघाडीचे राज्य आहे. यंदा रशियामधील काझन येथे वर्ल्ड स्किल्स स्पर्धा होणार आहे. त्यामध्ये देशभरातून ४८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुंबईतील संस्थेचा पायाभरणी समारंभ लवकरच प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कौशल्य विकासाच्या दृष्टीने मंत्रिमंडळानेही अलीकडेच महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले आहेत. राज्यातील विविध योजनांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न आहे. या प्रयत्नात ही महत्त्वपूर्ण संस्था सुरु होणे महाराष्ट्राच्या दृष्टीने गौरवास्पद अशी बाब आहे.

Similar News