सार्वजनिक वाहतूक लवकरच सुरु होणार?

Update: 2020-05-07 01:06 GMT

लॉकडाऊनमुळे देशभरात ठप्प झालेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लवकरच सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी दिली आहे. बस आणि कार वाहतूक संघटनेच्या प्रतिनिधींशी गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला, त्यावेळी त्यांनी सार्वजनिक वाहतुकीला सशर्त परवानगी देण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती दिली.

जनतेमध्ये विश्वास निर्माण कऱण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करणे गरजेचे आहे. पण त्याचबरोबर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, हात स्वच्छ धुणे, तोंडावर मास्क लावणे यासारखे नियम पाळावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर लंडनच्या धर्तीवर भारतातही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सरकारची भागीदारी कमी करुन खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा विचार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक आता सुरू करण्याची गरज आहे असेही गडकरी यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी सरकार सर्व पातळ्यांवर काम करत असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली आहे.

Similar News