कोरोनाशी लढा – अर्थव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी RBI तर्फे पॅकेजचा डोस

Update: 2020-04-17 05:28 GMT

कोरोनामुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी ५० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. छोट्या आणि मध्यम वित्तीय संस्थांसाठी ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. RBIचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेऊन रिझर्व्ह बँकेने केलेल्या उपाययोजनांची घोषणा केली. यामध्ये नाबार्डला २५ हजार कोटी, SIDBIला १५ हजार कोटी आणि नॅशनल हाऊसिंग बोर्डासाठी १० हजार कोटी देण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या संकटकाळात बँकांना मोठ्या प्रमाणात कर्जवाटप करता यावे यासाठी रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो रेट ०.२५ टक्क्यांनी घटवून आता ४ वरुन ३.७५ टक्क्यांवर आणला आहे. देशाची बँकिंग यंत्रणा सक्षमपणे काम करत असून देशातील ९१ टक्के एटीएम पूर्णपणे कार्यान्वित आहेत. लॉकडाऊनच्या काळात इंटरनेट आणि मोबाईल बँकिंगचेचे व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले. २०२०मध्ये जगभरातील आर्थिक व्यवहारांमध्ये १३ ते १४ टक्के घट होण्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. कोरोनाच्या महासंकटामुळे संपूर्ण जग एका ऐतिहासिक मंदीच्या दिशेने प्रवास करत आहे, पण इतर देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे, अशी माहितीही दास यांनी दिली.

Similar News