अमरावती: आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे कोरोना संदर्भात आढावा घेण्यासाठी अमरावतीत आले असता, अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद सुरू असताना ३५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण हा चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या पत्रकार परिषदेत शिरला. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
अमरावती शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल न केल्याने तो येथे आला असल्याचे त्याने सांगितले, तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना भेटण्यासाठीही तो आग्रह करत होता. दरम्यान रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.
गेल्या 30 मिनिटापासून तो जिल्हाधिकारी कार्यालयात बसला आहे. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी विनवणी करूनही तो हटत नसल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. हे वृत्त प्रसारीत होईपर्यंत हा रुग्ण जिल्हाधिकारी कार्यालयातच बसून आहे...