१७ वर्षांपूर्वी केलेल्या चकमकीचा पर्दाफाश; 'प्रदीप शर्मा' यांना जन्मठेप...! नेमकं काय प्रकरण आहे? वाचा

Update: 2024-03-20 11:03 GMT

२००६ साली झालेल्या रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या याला छोटा राजनचा हस्तक असल्याच्या आरोपावरून चकमकीप्रकरणी सत्र न्यायालयाने निर्दोष ठरविलेले 'चकमक फेम' पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना उच्च न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. येत्या तीन आठवड्यात त्यांना तुरुंगात हजर होण्यास सांगितले आहे. एवढंच नाही तर १२ पोलीसांसह एका खासगी इसमालाही जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या घटनेला तब्बल १७ वर्षे झाले असून राजकारणात सक्रीय होऊ पाहणाऱ्या शर्मा यांना न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. बनावट चकमक प्रकरणात इतक्या मोठ्या प्रमाणात जन्मठेपेची शिक्षा होण्याची ही पहिलीच घटना आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी काय?

११ नोव्हेंबर २००६ रोजी अंधेरी पश्चिम नाना-नानी पार्कजवळ डी.एन. नगर आणि जुहू पोलीसांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत छोट्या राजनचा हस्तक असल्याच्या आरोपावरून राम नारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या याला चकमकीत ठार करण्यात आले. मात्र ही चकमक बनावट असल्याचा आरोप लखनभैय्याचा भाऊ अॅड. रामप्रसाद गुप्ता यांनी केला होता. वाशीतील निवासस्थानाजवळुन मुंबई पोलीसांच्या पथकाने लखनभैय्या आणि अनिल भेडा या दोघांचे अपहरण केले. त्याचवेळी तात्काळ मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांना फॅक्स करून लखनभैय्याच्या जीवाला धोका असल्याचे कळविले होते. मात्र आपल्या फॅक्सची दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर डी.एन. नगरच्या पोलीस स्टेशन हद्दीत लखनभैय्या याला चकमकीत ठार केले. असा आरोप करीत अॅड. रामप्रसाद गुप्ता याने न्यायालयात धाव घेतली होती.

बनावट चकमकीचा पर्दाफाश

उच्च नायालयात याचिका दाखल करीत अॅड. रामप्रसाद गुप्ता यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली. उच्च न्यायालयाने अंधेरी मोबाईल न्यायालयाला चौकशी करण्याचे आदेश दिले. रेल्वे मोबाईल न्यायालयाने याची चौकशी करून अहवाल उच्च न्यायालयात सादर केला. या अहवालात लखनभैय्याची बनावट चकमकीच हत्या झाल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने परिमंडळ-९ तत्कालीन उपायुक्त के. एम. एम. प्रसन्ना यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास स्थापन करण्याचे आणि रामप्रसाद गुप्ता यांचा जबाब 'एफआरआर' म्हणून दाखल करण्याचे आदेश दिले. प्रसन्ना यांच्या पथकाने लखनभैय्याच्या बनावट चकमकीप्रकरणी गुन्हा दाखल करून ७ जानेवारी २०१० रोजी सगळ्यात अगोदर प्रदीप शर्मा यांना सहकाऱ्यांसह अटक केली.

उच्च न्यायालयाकडून निकाल

२०१३ साली रामनारायण ऊर्फ लखनभैय्या बनावट चकमक प्रकरणात सत्र न्यायालयाने २१ जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्यामध्ये १२ पोलीसांचा समावेश होता. प्रदीप शर्मा यांची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या सर्वांनी आपल्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

शर्मा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर त्याविरोधात राज्य शासनाने अपील दाखल केले होते. याशिवाय लखनभैय्या याचा भाऊ अॅड. रामप्रसाद गुप्ता यानेही याचिका दाखल केली होती. अशा १६ याचिकांवर निकाल देताना न्या. रेवती डेरे आणि न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपिठाने प्रदिप शर्मा यांना दोषी ठरवत जन्मठेप सुनावली आहे.



Tags:    

Similar News