लग्नानंतरही ऍस्ट्रॉनॉट होता येतं - अनिमा पाटील

Update: 2017-02-02 12:10 GMT

इच्छा शक्ती असेल तर कुठलंच स्वप्न अपूर्ण राहत नाही, अगदी लग्न आणि दोन मुलांनंतर सुद्धा ऍस्ट्रोनॉट होता येतं हे अनिमा पाटील यांनी सिद्ध करून दाखवलंय. याच अनिमा पाटील सांगत आहेत त्यांच्या आणि तुमच्या भविष्यातल्या करीअरविषयी ..

आपल्या देशात आज मुलींसाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. आज समाजात मुलींच्या उच्च शिक्षणाला महत्त्व प्राप्त झालंय. आई-वडीलही मुलींच्या शिक्षणासाठी भरपूर पाठींबा देतात. अगदी विवाहीत स्त्रियांना त्यांच्या सासरकडच्या मंडळीकडून शिक्षणासाठी मदत मिळते.

तरी सुद्धा, स्त्री मग ती कुठल्याही वर्णाची असो तिला सगळीकडेच स्त्री-पुरुषांमधल्या भेदभावांना सामोरे जावं लागतं. अमेरिकेतसुद्धा मला ते प्रकर्षाने जाणवलं. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनच पगार मिळावा यासाठी एक कायदा पास केला. हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे.

एक महिला त्यातही आशियायी म्हणून मला देखील वर्णद्वेषाला सामोरे जावं लागलं होते. एका प्रोजेक्टची प्रमुख म्हणून काम करीत असताना माझे गौरवर्णीय सहकारी नाखूष असल्याचा अनुभव मला आला आहे. परंतु अशा आव्हानांना मी धीराने आणि आनंदाने सामोरे गेले होते. ऍस्ट्रोनॉट म्हणून माझे उद्दिष्ट गाठायचे असेल तर या गोष्टींचा बाऊ करत बसणे योग्य नव्हे तर सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणे आवश्यक होते.

अंतराळ मोहिमेसाठी भरपूर तयारी करावी लागते. मानसिक आणि शारिरीक दृष्ट्या कणखर बनाव लागतं. “नेवर से डाय” ही वृत्ती कायम ठेवावी लागते. स्वतः मध्ये कायम शिकत राहण्याची वृत्ती बाणवावी लागते. त्याचबरोबर कितीही यशस्वी झालात तरी कायम नम्र आणि दुस्र्याप्रती आदरभाव ठेवावा लागतो.

चाळीशीत माझ्या स्वप्नांना गवसणी घालण्याची संधी मला मिळाली. स्वप्न पूर्ण करायला ज्या काही अडचणी येतील त्यांचीही मला चांगल्या प्रकारे कल्पना होती. परंतु ध्येयपूर्तीचा हा प्रवास आनंददायी आणि परिपूर्ण करणारा वाटतो. आपले ध्येय गाठताना प्रेरणा, मार्गदर्शन आणि स्फूर्ती यांचाच आधार घेतला. कुठलेही ध्येय साध्य करायला कितीही उशीर झाला तरी स्वतःवर विश्वास ठेवतानाच कष्ट करण्याची तयारी ठेवली की तुमचे यश तुमच्यापासून फार काळ दूर राहू शकत नाही. तुम्हाला इतरांसाठी काहीतरी केल्याचं समाधान नक्कीच मिळवून देईल.

भारतीय स्त्री हुशारच...फक्त संधीची कमी...

माझ्या फेसबूकपेज http://www.facebook.com/animpatilsabale वर कितीतरी मुलींचे मला प्रश्न येत असतात. एरोनॉटीक्समध्ये करीअर करायचंय असं सांगतात. संशोधक कसं व्हायचं असे प्रश्न विचारतात. मुलींच्या प्रश्नांमधूनच त्यांची आवड-निवड आणि मेहनत करण्याची इच्छा प्रतित होते. यावरून हे स्पष्ट होतं की या मुलींना फक्त एक संधी मिळली तरी त्यात त्यांची छाप या क्षेत्रात उमटवतील

काही अगदी पाच-सात वर्षांच्या मुलींच्या पालकांनी सुद्धा मला संपर्क केलाय. मुलींना कसं शिक्षण द्यायच? काय करावं काय करू नये असे अनेक प्रश्न विचारत असतात. यावरून हे स्पष्ट होतं की आजकाल फक्त मुलींच नाही तर त्यांचे आईवडिल सुद्धा तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रात त्यांना अग्रेसर बघू इच्छितात. इस्रोमधल्या मंगलयान आणि इतर सॅटेलाईट लॉन्चमध्ये भारतीय महिला संशोधकांचे फोटो ज्या पद्धतीनं आणि ज्या कौतुकानं सोशल मीडियावर व्हायरल झालेत, हे भारतीय महिलांचं क्षेत्रातला ठसा दाखवणारं आहे.

खरंतर भारतीय स्त्रिया टेक्निकली हुशार असतातच. फक्त आता गरज आहे ती वर्णद्वेष आणि जेंडर बायसवर उपाययोजना शोधून काढण्याची. मला वाटतं स्त्रियांनी या क्षेत्रात अजून प्रगती करावी, पुढे यावं, जास्तीत जास्त मुलींनी इंजिनिअरींग आणि टेक्नॉलॉजीमध्ये करीअर करावं. जेणेकरून स्त्रियांची या क्षेत्रात संख्या वाढेल आणि नक्की बदल घडेल.

खासगी आणि सरकारी क्षेत्रानं विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देणं गरजें आहे. अमेरिकेत हायस्कूलपासूनच मुलांना इंटर्नशिपच्या संधी मिळतात.

नासामध्ये अमेरिकी नागरीक असलेल्या विद्यार्थ्यांना वर्षभर इंटर्नशिपची संधी मिळते. विशेषत: उन्हाळी सु्ट्टीमध्ये खास इंटर्नशिप दिल्या जातात. इस्रोनं देखील तसं सुरू करणं गरजेचं आहे. त्याची योग्य ती प्रसिद्धी करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जेणेकरून इस्रोला फ्रेश यंग माईंड्स विथ नॉवेल्स आयड्या मिळतील. फक्त इस्रोच नाही तर इतर प्रायव्हेट कंपन्यांनी सुद्धा अशा प्रकारची संधी उपलब्ध करून दिली पाहीजे.

अंतराळ संशोधनच का ?

मनुष्य हा नेहमीच एक क्युरिअस प्राणी राहिलाय. ह्युमन क्यरिऑसीटीमुळेच वास्को द गामानं भारत आणि कोलंबसनं अमेरिका शोधला. नवीन शोध लावणं माणसाच्या रक्तातच आहे. And this same curiosity has taken us to outer space...या कुतुहलामुळेच मनुष्य चंद्रावर पोहोचलाय आणि आज इंटरनॅसनल स्पेस स्टेशन सारखी अवाढव्य लॅबोरॅटरी पृथ्वी भोवती फिरत आहे. ही लॅबोरेटरी मनुष्यानं अंतराळात मायक्रोग्रॅव्हीटी आणि स्पेसच्या व्हॅक्युममध्ये बांधली आहे. अशक्य अशा गोष्टी आज शक्य झाल्यात. अंतराळ संशोधनामुळे किंवा त्यासाठी करण्यात आलेल्या संशोधनातून निघलेल्या कितीतरी टेक्नॉलॉजींचा वापर आज आपण आपल्या दैनंदिन कामात करतोय. मग ते मेडिकल इंडस्ट्रीमध्ये वापरली जाणारी एक्स-रे टेक्नॉलॉजी असो किंवा किचनमध्ये वापरली जाणारी मायक्रोव्हेव टेक्नॉलॉजी...या आणि अश्या अनेक टेक्नॉलॉजी अंतराळ संशोधनातून निघाल्या आहेत.

मानवजात अंतराळात विखुरलेली आहे. हे आज ही कल्पनातीत वाटतं. पण पुढच्या शंभर दोनशे वर्षाच्या काळात हे सहज शक्य आहे. हवेत उडणारी विमानं आणि मानवाचे अवकाशउड्डान या कधीतरी अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी आता सहज शक्य आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाच्या घटक झाल्यात.

दिवसेनदिवस आपणच आपल्या ग्रहावरील जीवन धोक्यात घालतोय. युध्द, आण्विक शस्त्रांचा वापर किंवा उल्काप्रहार सारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पृथ्वीवरील मानवी जीवन क्षणात बेचिराख होऊ शकते. त्यामुळे मानव प्रजाती वाचविण्यासाठी आणि तिला डायनासोर सारखं नामशेष होऊ न देण्यासाठी मंगळासारखे ग्रह शोधून तिथं मानवी वस्त्या वसवणं सध्याच्या परिस्थितीत अत्यावश्यक झालंय. पण ही मानवजात आकाश गंगेत विखुरली जाण्याअगोदर या संदर्भात प्रचंड संशोधन होणे फार जरुरी आहे. अंतराळातलं वातावरण हे मानवी जीवनाला अजिबात अनुकूल नाही. किरणोत्सार, लघु गुरुत्वाकर्षण जीवनावश्यक वायूची कमतरता आणि वातावरण हे सर्व घटक मानवी जीवनास प्रतिकूल आहेत. त्यामुळेच मानवाला अंतराळात राहायला पाठविण्याआधी या क्षेत्रात प्रचंड संशोधनाची गरज आहे. आतापर्यंत इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये काही अंतराळवीरांनी वास्तव्य केलं. त्यांच हे वास्तव्य मानवी शरीरावर अंतराळातल्या वास्तव्यात काय परिणाम होऊ शकतात यावरील संशोधनाच्या दृष्टीनं एक महत्वाचे पाऊल आहे. हा झाला अंतराळातील एक संशोधनात्मक प्रवाह.

पण. याशिवाय अॅस्ट्रोनॉमि, अॅस्ट्रो फिजिक्स, प्लानेटरी सायन्स हे अंतराळ संशोधनातील फार महत्वाचे विषय आहेत. यातील संशोधनामुळेच आपल्याला आज आकाश गंगा , ब्लाक होल्स, नेब्युला ,विविध तारे आणि त्याभोवती प्रदक्षिणा घालणारे ग्रह या सर्वांविषयी माहिती मिळाली आहे. १९८० मध्ये हबल सारख्या टेलीस्कोपमुळे अंतराळातील कितीतरी नवनवीन आणि अद्भूत गोष्टी आपण बघू शकलो. नवनवीन ग्रहांचा शोध लागल्यामुळे आपल्याला आपला सूर्य हा एकमेव मोठा ग्रह नसून त्याहूनही प्रचंड विशाल असे ऊर्जा असलेले ग्रह अस्तित्वात आहेत हे ठाऊक झालं. इतर आकाशगंगामधल्या सुर्यासारख्या ग्रहांवर संशोधन सुरु असल्यामुळे आपल्या आकाशगंगेतील सूर्याच्या पुढील भविष्याचा अंदाज बांधता येऊ शकतो. सूर्याच्या सौरउर्जेचा प्रचंड मोठा स्त्रोत उत्सर्जित होऊन जर आपल्या दिशेने आला तर त्यापासून होणारं नुकसान टाळण्यासाठी बऱ्याच अंशी आपण आता सज्ज आहोत. सध्या हा किरणोत्सार अत्यल्प असल्यामुळे पृथ्वीवरच्या वातावरणात तो शोषला जात आहे. तसंच त्यापासून होणारी हानीची तेवढीशी काळजी घेतली जात नाही. पण कधीकधी या किरणांमुळे आंतराळातल्या उपग्रहांच्या कामगिरीत व्यत्यय आलेला आहे. तसंच टेली कॅम्युनिकेशनमध्ये ही त्याचा प्रतीरोध झालेला आहे. अवकाश संशोधनामुळे आपण आपल्या ग्रहाप्रती अधिक चांगल्या प्रकारे सजग झालो आहोत.

सध्या शेकडो मानवनिर्मित सॅटेलाइट्स पृथ्वी भोवती प्रदक्षिणा घालत आहेत. त्यामुळेच आपल्याला पृथ्वीवरच्या हवामानाचा आणि भौगोलिक बदलांचा सहजगत्या वेध घेता येतो. तसंच जगाच्या पाठीवर कुठेही सहजतेनं आणि वेगानं एकमेकांच्या संपर्कात राहू शकता येतंय. परिणामी संपूर्ण जग म्हणजे एक ग्लोबल विलेज अशी संकल्पना आता आकारास येऊ लागलीय. याशिवाय मानव निर्मित सॅटेलाइट्समुळे हवामान बदलाची तसंच ग्लोबल वार्मिंग संबंधात अद्ययावत माहिती मिळत आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण ऱ्हास रोखण्यासाठी अत्यावश्यक यंत्रणा राबवविली जातेय.

या आणि अश्या अनेक नवीन अविष्कारांमुळे टेक्नोलोजी आपल्या जीवनमानात महत्वाचा रोल बजावतेय. त्याचबरोबर या क्षेत्रात सतत अधिकाधिक संशोधनाची गरज आहे, हे सुद्धा आपल्याला जाणवू लागलंय. मला नेहमीच असं वाटतं की युद्धसामग्री संशोधनावरील खर्चाऐवजी अंतराळ संशोधनावर जास्त प्रमाणात निधी खर्च व्हावा. युद्धांमुळे मानव जातीचा संहारच अपेक्षित असतो, पण अंतराळातील संशाधनामुळे मानवी प्रगतीच्या नवीन वाटा चोखाळायला भरपूर वाव आहे.

अनिमा पाटील

http://www.facebook.com/animpatilsabale

Similar News