मॅक्स महाराष्ट्र आणि राज्य महिला आयोगाच्यावतीने शनिवारी मुंबईत मॅक्स वूमन पुरस्काराचे वितरण करण्यात आलं. राज्याच्या विविध भागातील आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांना मॅक्स वूमन म्हणून गौरवण्यात आलं. कोण कोण मॅक्स वूमन ठरल्या आहेत ते पाहूयात....
१. आशालता गिरी (परभणी)
जन्मत: दोन्ही पायांनी अपंग असलेल्या परभणी जिल्ह्यातील आशालता गिरी यांनी बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे महत्वाचे काम केले आहे. कौटुंबिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही आपल्या जिद्दीच्या जोरावर एक नव्हे तर गावातील 100 हून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे तसेच महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून तसेच शेळी पालनात अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला..
२. सत्यभामा सौंदरमल (बीड)
बीड जिल्ह्यातील सत्यभामा सौंदरमल मराठवाड्यात दारुबंदीविरोधातील चळवळ समर्थपणे चालवत आहेत. सत्यभामा सौंदरमल यांचे बालपण अतिशय खडतर परिस्थितीत गेले. प्रतिकूलतेचा त्यांना सामना करावा लागला. मात्र या प्रतिकूलतेवर मात करत त्या महिला हक्काच्या चळवळीत सक्रिय झाल्या. दारूबंदीशिवाय महिलांवरील अत्याचाराविरोधातही त्या संघर्ष करत आहेत
३.उज्वला हावरे (नवी मुंबई)
हावरे इंजिनीअर्स अँड बिल्डर्सच्या अध्यक्ष उज्वला हावरे यांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना निवारा मिळवून दिला आहे बॅचलर ऑफ आर्किटेक्चर असणाऱ्या उज्वला हावरेंवर पती सतीश हावरे यांच्या निधनानंतर अचानक व्यवसायाची जबाबदारी पडली. संकटावर मात करत त्यांनी समर्थपणे व्यवसायाची जबाबदारी सांभाळली. आपल्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी ४५ हजारांहून अधिक किफायतशील घरांची निर्मिती केली आहे. सामाजिक कार्यातही त्या पुढाकार घेत आहेत. १०० हून अधिक पुस्तक पेढ्या आणि अभ्यासिकांची उभारणी केली आहे. भाजीविक्रेते, रिक्षाचालक यांच्यासाठी २०० घरांचा प्रकल्प त्यांनी उभारला आहे.
४. नंदिनी जाधव (पुणे)
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महत्वाच्या कार्यकर्त्या असलेल्या नंदिनी जाधव यांनी जटामुक्तीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्वाचे काम केले आहे. अनेक महिलांची त्यांनी जटांपासून मुक्ती केली आहे. स्त्रियांच्या
बाह्यसौंदर्यापेक्षा स्त्रियांचे आंतरिक वैचारिक सौंदर्य वाढवण्यासाठी त्या ब्युटी पार्लरच्या व्यवसायातून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत आल्या. .डॉ. दाभोळकरांच्या हत्येनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून परंपरा, रुढी, प्रथा , अंधश्रद्धा यांना बळी पडलेल्यांना वैज्ञानिक विचारांकडे घेऊन जाण्याचे काम करत आहेत.
५. नीलिमा बावणे (नागपूर)
नागपूरमध्ये महिलांच्या हक्काची पहिली बँक स्थापन करण्याचे काम नीलिमा बावणे यांनी केले आहे. घरकाम करणाऱ्या महिलांना उद्योग करण्याचे प्रशिक्षण देणं, त्यासाठीचे आर्थिक पाठबळ मिळवून देणे हे त्यांनी धरमपेठ महिला बँकेच्या माध्यमातून करून दाखवले आहे. आज धरमपेठ महिला बँकेचा 3 राज्यांत विस्तार असून 1200 कोटींचा टर्नओव्हर आहे.
६. गौरी काटे(बारामती)
बारामतीजवळच्या काटेवाडीच्या सरपंच असलेल्या गौरी काटे यांनी सरपंच म्हणून गावात स्वच्छता मोहीम अत्यंत यशस्वीपणे राबवली आहे. २००५ पासून सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असून २०१३ पासून त्या काटेवाडीच्या सरपंच आहेत. “पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना’ अर्थात इको-व्हिलेज म्हणून या त्यांनी काटेवाडीची ओळख निर्माण केली आहे. ग्रामस्वच्छतेसाठीचा पुरस्कारही त्यांनी काटेवाडी ग्रामपंचायतीला मिळवून दिला आहे.
७. अरुणा बोळके (धुळे)
धुळ्याच्या अरुणाताई बोळकेंनी स्वत: दृष्टिहिन असूनही इतरांचे आयुष्य प्रकाशमान करत आहेत. वयाच्या पाचव्या वर्षी अरुणाताईंनी त्यांची दृष्टी गमावली. मात्र जिद्दीच्या बळावर त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. आज आपला संसार थाटून त्या सर्वशिक्षण अभियानातंर्गत धुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत एक विशेष शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दिव्यांग मुलांना त्या शिकवत आहेत.
८. भाग्यश्री रणदिवे (लातूर)
लातूरच्या भाग्यश्री रणदिवे परित्यक्ता महिलांच्या कल्याणासाठी कार्यरत आहेत. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात त्या कोरो आणि एकल महिला संघटनेच्या माध्यमातून काम करत आहेत. परित्यक्ता महिलांच्या हक्कासाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत. उस्मानाबाद येथे झालेल्या एकल महिला संमेलनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
९. डॉ. मेधा मेहंदळे (मुंबई)
आयुर्वेद संशोधनात आयुर्वेदाचार्य डॉ. मेधा मेहंदळे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तन्वीसपॅथी ही विशिष्ट उपाचारपद्धती निर्माण करून त्यांनी आयुर्वेद क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांची तन्वी हर्बल ही पुस्तिका आजीबाईंच्या बटव्यांसारखी घरोघरी जाऊन पोहचली आहे. केवळ आयुर्वेदाच्या उपचारापुरतेच स्वत:ला मर्यादीत न ठेवता त्यांनी देशात तसेच परदेशात आयुर्वेद आणि निसर्गोपाचाराचा व्याख्यानाद्वारे प्रसार केला आहे.